पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मजुरांना मंजुरी मिळत नाय. चारीचं कुपन मिळत नाय.. योच खरा अन्याय हाय... तो तुमी चालू देणार ? - नाय, शाप नाय -! या - या महादूला लई ढोस चढलीया... तेस्नी चांगलाच धडा शिकवाया हवा-'

 सारे उपस्थित गावकरी त्याच्या प्रभावाखाली आले होते आणि दाजिबाने त्यांच्याकडून खुबीनं महादूला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर सामाजिक बहिष्कार : टाकण्यासाठी कबूल करवून घेतलं होतं !

 आणि गावक-यांचा महादूवर अलिखित सामाजिक बहिष्कार सुरू झाला. दोन दिवस महादूला त्याची जाणीव झाली नाही. पण गिरणीत पीठ आणण्यासाठी जेंव्हा त्याचा मुलगा गेला, तेव्हा गिरणीवाल्यानं त्याला शिव्या हासडून परत पाठवलं , तर पाणवठ्यावर आवडाशी कोणी बोललं नाही. महादू स्वतः जेव्हा गावातल्या एकमेव किराणा दुकानात सामान आणायला गेला, तेव्हा दुकानदारानंही त्याला सामान दिलं नाही. तेव्हा तो खवळला आणि थेट सरपंचाच्या घरी गेला आणि गरजला,

 ‘सरपंच, हे बरं नाही. हा असा सामाजिक बहिष्कार टाकणं हा कायद्यान गुन्हा आहे. मी जर लेखी तक्रार केली तर तुमच्यासह सर्वानाच त्रास होईल व गंभीर परिणाम होतील...'

 झोपाळ्यावर मंद झोके घेत सरपंच तंबाखू दाढेखाली धरून बैठकीत बसलेल्या गावक-यांशी व ग्रामपंचायत सदस्यांशी बोलत होते. क्षणभर त्यांनी थंडपणे महादूकई व उपस्थितांकडे पाहिलं व मग शांतपणे म्हणाले,

 'अरे बाबा महादू, म्या नाई सांगितलं बहिष्काराचं. म्या सोता त्याच्या इरुद्ध हाय... म्या सरपंच हाय, कायदाकानून ठाव हाय मला. म्या असं कसं करेन? या नाय टाकला तुझ्यावर बहिष्कार....!' आणि क्षणभर थांबून नाटकी स्वरात म्हणाले, 'अरे बाबा, असा उभा का? ये, असा बस - माझ्या शेजारी - बकळ जागा हाय झोपाळ्यावर.... कारभारी, जरा च्या सांगा- वीरचक्रवाले महादेव कांबळे आलं हाईत... महादू - ये बाबा, असा ये जवळ ...."

 महादू त्यांच्या या पवित्र्यानं सर्द झाला होता. चार लोकांदेखत सरपंचान त्यांना आपल्या शेजारी झोपाळ्यावर जागा देऊ केली होती, चहाचा आग्रह केला होता आणि समोर उपस्थितांमध्ये काही दलितही होते. हा सारा बेत दाजिबानं व्यवस्थितपणे जुळवून आणला असणार, यात काही शंका महादूला उरली नव्हती.

 ‘महादू, दोन दिस म्याबी इथं नव्हतो.... गाववाल्यानं असा सामाजिक बहिष्कार टाकायला नाय पायजे... म्या सा-यांनी सांगतो - तुला काई तरास होणार नाय... बहिष्कार टाकला असेल गाववाल्यांनी, तर तो आग उठेल... म्या त्येंना हात जोडून इनंती करेन बाबा तुझ्यासाठी. तू आमच्या गावची शान हायेस- वीरचक्र मिळाल हाय ना तुवास्नी... तोवर तुला मीठ - मिर्ची देतो - कारभारी, ज्वारीचं पीठ द्या बांधून महादूला... अन् त्या गिरणीवाल्या जावयाला सांगावा धाडा- म्या बोलवलंय म्हनून..." महादू - मी तेला व दुकानदाराला सांगेन...'


पाणी! पाणी!! / २६