पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही बाब पूर्णतः तांत्रिक असते. त्यासाठी पुन्हा सर्व्ह करणा-या त्याच डेप्युटी इंजिनिअरला विचारावं लागणार. पण तो हे कधीच कबूल करणार नाही, हेही उघड होतं. तेव्हा रोजगार हमी शाखेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यामार्फत तपासणी करून घ्यावी लागेल...

 तहसीलदार काही न बोलता विचारात गर्क झाले होते. पण या साच्या बाबीत फार वेळ जाणार होता. तोवर रिकाम्या हातांचं काय? हा प्रश्न होता. तहसीलदारांना ती चिंता होती. कारण या भागात शेतकरी - शेतमजूर पंचायत प्रबळ होती. त्यांच्यामार्फत मजुरांनी लेखी अर्ज विहित नमुन्यात करून काम मागितलं तर कुठलं द्यायचं ? ही अवघड समस्या होती. जवळपासच्या आठ किलोमीटर परिसरात दुसरं कोणतंही काम तातडीने उपलब्ध होण्यासारखं नव्हतं! म्हणून हे काम सुरू होणं गरजेचं होतं, त्याचा हा असा वांधा झाला होता.

 महादेव कांबळे हा खरंच बोलत असावा हे तहसीलदारांना जाणवत होतं, पण ते चौकशीत सिद्ध होईल का? मूळच्या सर्व्हेक्षणाची कागदपत्रे तर डेप्युटी इंजिनिअर ठेवणार नाही - कंटुरमॅपप्रमाणे पुन्हा इतर यंत्रणेमार्फत सर्व्ह करावा लागेल...

 ‘साहेब, ह्यो कांबळे तुमास्नी येड पांघरून पेडगावला नेत हाय...' दाजिबा म्हणाला. 'म्याबी म्हंतो, हून जाऊ द्या, तुमी चवकशी करा....' त्याने थंड डोक्यानं विचार करीत महादूचं आव्हान स्वीकारण्याची घोषणा केली. त्याचाही हिशोब तहसीलदारांच्या विचाराप्रमाणे होता !

 काहीच निर्णय न घेता तहसीलदार व बी. डी. ओ. जीपमध्ये बसून निघून गेले. महादूही उपस्थित गावक-यांकडे पाहात घरी परतला.

 पण दाजिबानं गावक-यांना थांबवून धरलं व महादू दृष्टिआड झालेला पाहून तो मधाळ स्वर पेरीत बोलू लागला,

 ‘म्हटलं हाय ना, चोर तो चोर, वर शिरजोर... महादूची तीच गत हाय बाबांनो. तेस्नी मिलिटरीची लई ढोस हाय. पन तुमीच बगा, माजी सीलिंगची जिमीन निघाली, ती महादूला मिळाली, आजून दोघांना मिळाली... त्या मी मनात आणलं अस्तं तर रोकू शकलो असतो, कोर्टकचेरी करता आली असती, पण म्या नाय तसं केलं... असा हा दाजिबा आपुली सोताची जिमिन वाचावी म्हणूनशानी असं वंगाळ काम करेल? छ्या छ्या, नाय बाबांनू नाय, म्या असं करेन तर माह्या सात पिढ्या नरकात जातील... महादू झूट बोलतोया...' त्याच्या समोर हातांना काम नसल्यामुळे व पोटाला फाके पडू लागल्यामुळे समस्त गावकरी होते. ‘अलाईनमेंट बदलणं व पाझर तलावाची साईट सरकावून घेणं' या तांत्रिक बाबी, जाणाऱ्या होत्या हे धूर्त दाजिबा जाणून होता, म्हणून त्याला स्पर्श न करता त्यांच्या काळजाला हात घालीत तो पुढे म्हणाला,

 ‘तुम्ही आमचे मायबाप मतदार - तुमच्या जीवावर तर म्या सरपंच झालो... म्या तुमच्याशी कदी सुदीक बेइमानी करणार नाय... आता खरा सवाल हाय तुमास्नी काम देण्याचा... मला तुमीच सांगा, योका माणसाच्या आडमुठेपणापायी साठ-सत्तर

लढवय्या /२५