पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नुकतीच जमिनीत रुजू लागलेली व जमीन धरू लागलेली आपली मुळे उखडली जाताहेत या जाणिवेनं तो हादरून गेला...

  हा दाजिबाचाच डाव होता हे निश्चित. याची महादूला पूर्ण खात्री होती. त्याच्या शेजारी त्याचीच जमीन सीलिंगमध्ये मिळून आपणही शेतमालक बनलो, हे त्याला सहन होत नाही. अजूनही त्याच्या डोक्यात व मनात आपली - धर्मांतर करून बौद्ध झालो असलो तरी म्हारकीची भावना घर करून आहे, हे महादूला दाजिबाच्या शब्दातून नव्हे, तर कृतीतून जाणवत होतं.

 त्यानं तालुक्याला जाऊन सर्व्हेक्षण करणा-या इंजिनिअरची भेट घेतली व तळमळीनं सांगितले,

  ‘साहेब, मी रिटायर्ड लान्सनाईक आहे महार रेजिमेंटचा. मला एकाहत्तर युद्धात पराक्रमाबद्दल वीरचक्रही मिळालं आहे सर. शासनानं आमचं पुनर्वसन व्हावं म्हणून ही जमीन दिली, ती पूर्णपणे तुम्ही घेणार? यात शासनाने त्याच्या खर्चानं मला फळबाग रोजगार हमीतूनच करून दिली आहे... आणि आमची पेन्शन किती कमी असते हे तुम्हाला मी सांगायला नको. त्यावर आणि या जमिनीच्या उत्पन्नावर आमचं कुटुंब कसंतरी जगतंय, तेच तुम्ही हिरावून घेतल्यावर आम्ही पोट कसे भरावं?"

 पण तो उपअभियंता हा बिनचेह-याचा निर्जीव - बथ्थड नोकरशहा होता. त्यानं थंडपणे उत्तर दिलं, “अलाईनमेंटप्रमाणे या पाझर तलावाच्या बुडीत क्षेत्रात तुमची जमीन येते, त्याला मी काय करू?"

 तो निराश होऊन बाहेर आला. आपण पुन्हा भूमिहीन होणार ही भावना त्याला सहस्र इंगळ्या डसाव्यात, तशी वेदना देत होती !

  महादूला मागून कुणीतरी हाक मारली, तसा भानावर येत त्यानं वळून पाहिलं, या कार्यालयातील सव्हेंअर होता, जो गावामध्ये पाझर तलावाच्या सर्व्हेसाठी आला होता. त्यानं चहा पीत जी माहिती दिली, ती ऐकून त्याला वेड लागायची पाळी आली आणि दाजिबा व त्या उपअभियंत्याची मनस्वी चीडही आली. कारण मूळच्या सर्वेक्षणाप्रमाणे निश्चित झालेल्या अलाईनमेंटमध्ये महादूच्या शेताला लागून असणारी दाजिबाची बारा - तेरा एकर जमीन जात होती, तर महादूच्या जमिनीचा एक इंचही जात नव्हता. उलटपक्षी तिथपर्यंत आठ-दहा महिने पाणी राहणार असल्यामुळे महादूला रब्बीसोबत उन्हाळी पीकही त्यामुळे घेता येणार होतं. आपली जमीन बुडीत क्षेत्रात जाणं आणि त्याचा भरघोस फायदा महादूला होणं, हे दोन्ही दाजिबाला नको होतं. त्यानं आपल्या सरपंचकीच्या जोरावर मूठ गरम करीत उपअभियंत्याशी हातमिळवणी केली आणि चक्क पाझर तलावाची अलाईनमेंट बदलली होती. त्यामुळे खर्चही वाढत होता. या नव्या अलाईनमेंटप्रमाणे महादूची पूर्ण जमीन पाण्याखाली जाणार होती!

 ‘ब्लड़ी सिव्हिलियन साला. महादूच्या ओठातून अस्सल शिवी आली. ‘साहेब, आम्ही सैनिक सीमेवर लढतो, पहारा देतो तो हा देश व या देशाची माणसं सुरक्षित राहावीत म्हणून. आणि हे आमची जमीन लुबाडतात, आमच्या जगण्याचं

लढवय्या । २१