पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 पहिली दोन वर्षं निसर्गानंही चांगलीच साथ दिली. त्याला हिरवा नजराणा भरघोस मिळाला; पण मागच्या वर्षी अपुऱ्या पावसानं सूर्यफूल व ज्वारी पूर्णपणे करपून गेली... त्याच्यासाठी हा फटका जबर होता. पण महादू आघाडीप्रमाणे जीवनाच्या क्षेत्रातही लढवय्या होता. आपलं सैनिकी तत्त्वज्ञान सांगताना आवडाला तो म्हणाला : होता, ‘वाईफ, अगं, एक लढाई हरली म्हणजे युद्ध हरलं असं समजायचं नसतं !'

 आणि त्याचवेळी त्याची फळबागेच्या योजनेसाठी निवड झाली. शासनाच्या खर्चाने आपल्या जमिनीवर फळझाडे लावण्याची अनोखी योजना. मेहनत आपण करायची आपल्याच शेतामध्ये. मजुरी शासन देणार. पुन्हा फळबागाचं उत्पन्नही आपलं. खरिपाचं पीक गेल्यामुळे नाउमेद बनलेल्या महादूच्या मनाला त्यामुळे उभारी आली.

 दीड वर्षानंतर त्याच्या जमिनीच्या दोन एकरात आंबा - डाळिंबाची झाडं चांगलीच तरारून आली होती ! त्याची कड़ी निगराणी व सक्त मेहनत कामाला आली होती. पण दिवाळी गेली तशी जमिनीतली ओल कमी झाली, झाडांना पाणी कमी पडू लागलं. तसं महादूनं दररोज दोन फर्लागावर असलेल्या पाझर तलावातून कावडीनं ‘लेफ्ट-राईट' करीत पाणी आणून झाडांना द्यायला सुरुवात केली.

 दाजिबानं त्याच्याविरुध्द हा पाझर तलाव बांधणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे तक्रार केली होती. पण शासनाची लाल फीत इथं महादूच्या पथ्यावर पडली. खरं तर त्या पाझर तलावाखाली जवळपास अर्धा - एक किलो मीटर क्षेत्रात एकही विहीर झालेली नव्हती; तलावाचं पाणी पाझरून खालच्या क्षेत्रात विहिरीचे पाणी वाढावं यासाठी पाझर तलाव बांधले जातात. पण खाली विहिरी नसल्यामुळे निव्वळ धूप होऊन जाणारं पाणी झाडांना पाजलं तर बिघडलं कुठं? हा त्याचा सवाल होता.

 पण यंदा दुष्काळाचं सावट गावावर आलं होतं. रब्बी पेर न झाल्यामुळे शेतमजुरांना व दुष्काळाचा फटका बसून खरीप गेलेल्या छोट्या - छोट्या शेतक-यांनाही पोटाची खळगी भरण्यासाठी काम हवं होतं. त्यात महादू - आवाचाही समावेश होता!

 गावक-यांनी गावातच दुष्काळी काम निघावं म्हणून अर्ज केला होता. त्यात दाजिबाचा सरपंच या नात्यानं पुढाकार होता. या अर्जावर महादूनंही सही केली होती - लफ्फेदार इंग्रजीत. बरेचसे सहीचे अंगठे, काही मराठीत तोड़कीमोड़की सही यामध्ये त्याची ऐटबाज सही उठून दिसत होती !

 काही दिवसांतच सर्व्हेसाठी डेप्युटी इंजिनिअर आले. पाझर तलावाची जागा निश्चित करून अलाईनमेंट घेण्यासाठी.... आणि महादूच्या अंगाचा तिळपापड झाला दाजिबाचा कावा त्याच्या ध्यानी आला.

 या पाझर तलावात जवळपास बारा एकर जमीन जाणार होती. त्यात महादूला सीलिंगमध्ये माजी सैनिक म्हणून मिळालेली पूर्ण पाच एकर जमीन जात होती. इंजिनिअरनी जेव्हा अलाईनमेंट केली, तेव्हा त्याच्या हे ध्यानी आलं. आणि


पाणी! पाणी!! / २०