पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 सकाळी आपल्या शेतावर जाऊन महादूनं गतवर्षी लावलेल्या फळबागेची पाहणी केली. शासनाच्या रोजगार हमीशी निगडीत फलोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी म्हणून त्याची निवड झाली होती व त्यानं माजी सैनिक म्हणून मिळालेल्या सीलिंगच्या पाच एकर जमिनीच्या दोन एकरावर आंबा व डाळिंबाची झाडे लावली होती. यंदाचं हे दुसरं वर्ष. पुढल्या वर्षी पीक पदरात येईल, तोवर जपलं पाहिजे फळबागेला. पाणी घातलं पाहिजे, झाडे जगवली पाहिजेत.

 उत्तरेला दोन फर्लागावर तीन वर्षांपूर्वी एक पाझर तलाव झाला होता. त्यात मार्च महिन्यातही पाणी शिल्लक होतं. तेथून त्यानं सैनिकी तडफेनं कावडीतून चार-पाच खेपा करीत पाणी आणून झाडांना दिलं होतं. ही फळबाग करपणार नाही एवढंच पाणी जेमतेम देता आलं. येत्या मृगात बरसात झाली की झाडं पुन्हा जोमाने वाढणार, पण तोवर त्यांना जपलं पाहिजे...

 सैन्यात असतानाच त्यानं गावी जमीन मिळावी म्हणून अर्ज केला होता व निवृत्तीच्या एक वर्ष आधी गावातील सरपंच दाजिबा पाटलाची जमीन सीलिंग कायद्याखाली अतिरिक्त म्हणून जाहीर झाली होती. त्यातला पाच एकराचा तुकडा महादूला सहजपणे मिळून गेला होता.

 गावी परतल्यावर त्यानं मोठ्या मेहनत - मशागतीनं ही जमीन जोपासली होती. अक्षरशः खडकाळ असलेली जमीन त्यानं राब राब राबून पिकाखाली आणली होती. आजवर गावकुसाबाहेर त्याच्या वाडवडलांची जिंदगी धर्मांतरापूर्वी म्हारकीची कामं करण्यात गेलेली, पण आज महादू जातिवंत शेतक-याइतकाच जमिनीवर जीव जडवून होता - त्यासाठी त्यानं रक्ताचं पाणी केलं होतं.

 दाजिबानं आपली जमीन सीलिंगमध्ये जाऊ नये म्हणून काय काय लटपटी - खटपटी केल्या होत्या; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तरीही महादूला मिळालेली जमीन त्याला सहजासहजी पचू नये अशा खटपटीत तो नेहमीच असायचा. ताबा मिळाल्यावरही सातबाऱ्यावर नाव लवकर आलं नाही; कारण गावतलाठी दाजिबानं फितवले. त्यासाठी तहसीलला दहा खेपा झाल्या, जिल्हा सैनिक बोर्डाकडे अर्ज केले, तेव्हा कुठे फेरफार होऊन मिळालेल्या जमिनीच्या मालकी व वहितीच्या रकान्यात त्याचं नाव लावलं गेलं.

 तो सातबाराचा निर्जीव कागद व त्यावर मालक म्हणून प्रतिबंधित का होईना, मालक म्हणून असलेलं आपलं नाव पाहाताना कणखर सैनिक असलेल्या महादूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर जिंदगी घालवणाऱ्या त्याच्या घराण्याला मूळ धरायला जमीन नव्हती, ती आज मिळाली होती. खऱ्या अर्थाने आज तो भूमिपुत्र झाला होता ! ‘वाईफ, क्या बात है...' एवढंच कसंबसं डोळे पुसत महादू म्हणाला आणि आपलं नित्याचं गडगडाटी हसू हसला.


लढवय्या / १९