पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/208

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कमी व्हत नाही. त्यासाठी औवशुद हवं. ते नाही तर पानी तरी हवं. अंग, पुना पुना पुसलं तर ताप कमी व्हईल. जा पोरी, पानी बघ पानी.'

 त्यामुळे आज - आता पाण्याचा टँकर यायला हवा होता. प्रज्ञा कितीतरी वेळ तशीच उभी होती.

 ...आणि तिच्या नजरेला दुरून येणारा पिवळा ट्रक उन्हामुळे झगमगताना दिसला. होय, हाच पाण्याचा टँकर आहे! ट्रकवर पाण्याची टाकी फिट करून त्याचा टँकर म्हणून उपयोग खातं करीत होतं.

 आता दहा मिनिटात टँकर तांड्यावर येईल आणि मग आपण रांजणभर पाणी भरून घेऊ... वहिनीचं सारं अंग थंड पाण्यानं पुसून काढू म्हणजे तिचा ताप झटकन उतरेल आणि ती सुखरूप बाळंत होईल व नव्हा बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करता येईल.

 प्रज्ञा एकटक खालून वर तांड्यावर येणा-या ट्रककडे पाहत होती. एक एक क्षण तिला प्रदीर्घ वाटत होता.

 आणि तो ट्रक वर येईचना. प्रज्ञानं डोळे चोळून पुन्हा पाहिलं. तो वाटेतच रस्त्यावर थांबला होता.

 'तो ट्रक बिघडला की काय?' हा प्रश्न तिच्या मनात चमकला आणि तिच्या पोटात पुन्हा एकदा भीतीचा गोळा आला.

 आणि ती बेभान होऊन, पायात चपला नाहीत हे विसरून तशीच वेगानं धावत खाली जाऊ लागली. आणि दोन मिनिटात धापा टाकीत, ठेचा खात, अडखळत जेव्हा ती ट्रकजवळ आली, तेव्हा तिथं ट्रकला टेकून इब्राहिम शांतपणे विडी फुकीत धूर काढीत उभा होता.

 'मेरी जान, परेशान लगती हो! क्यात बात है?' लोचटपणे इब्राहिम तिचा उभार बांधा आसक्त नजरेनं न्याहाळीत म्हणाला.

 जेव्हा जेव्हा इब्राहिम विखारी नजरेनं प्रज्ञाला पाहायचा, तेव्हा तिला वाटायचं, तो नजरेनंच आपल्याला विवस्त्र करून उपभोग घेतोय. तिच्या मणक्यात एक थंड असह्य स्त्रीत्वाची भीती चमकून जायची, पण तिला फारसा विरोधही करता येत नसे. कारण त्यानं एनेकदा गर्भित धमकी दिली होती,

पाणी! पाणी!! / २०६