पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/207

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतं. त्यातच हेही पाणी संपणार हे उघड होतं. ते संपल्यावर मात्र थेंबभर पाणी मिळणंही मुश्किल होतं.

 पुन्हा एकदा बाहेर येऊन प्रज्ञानं पंचक्रोशी न्याहाळली. “आता टँकर आलाच पाहिजे, आलाच पाहिजे!' ती स्वतःशीच पुटपुटली. एका नव्या जीवासाठी बादलीभर पाणी हवं होतं. आणि ते मिळणं किती कठीण झालं होतं! यात जसा निसर्गाचा हातभार होता, तसाच जातीच्या शापाचा, लाल फितीचा व बेपर्वाई अनास्थेचाही वाटा होता.

 कितीही शिकस्त केली तरी विचार करू शकणारं प्रज्ञाचं मन एकाच वेळी क्षुब्ध व अगतिक व्हायचं. जातीमुळे गावकुसाबाहेरचं निकृष्ट जिणं. संघर्ष केला, आवाज उठवला म्हणून बहिष्कृत होणं, याच्या जोडीला पोटाची विवंचना. आणि या सर्वात भीषण बाब म्हणजे पाण्याची समस्या - जिनं आज जीवन मरणाचं स्वरूप धारण केलं होतं.

 रमावहिनीसाठी ती व्याकूळ होती. तिच्यावर प्रज्ञाचा फार जीव होता. कारण रमावहिनीनं तिला भीमदादाच्या संसारात आल्यापासून मुलीप्रमाणे वागवलं होतं व नवयाच्या बरोबरीनं तिनंही प्रज्ञाला शिकण्यासाठी उत्तेजन दिलं होतं. एवढं शिकून - सवरून प्रज्ञानं रिकामं घरी बसावं व तिला काही काम मिळू नये, याची रमावहिनीला सर्वात जास्त खंत होती.

 आज तिची लाडकी रमावहिनी जीवन - मरणाच्या सीमारेषेवर तळमळत होती. तिचा ताप वाढत होता. हात लावला तरी चटका बसावा एवढे अंग तापलं होतं. सोजरमावशीजवळ ताप कमी करण्यासाठी गवती चहाखेरीज कसलाच उपाय नव्हता व तो चहा या तांड्यावर उपलब्ध नव्हता. सकाळी प्रज्ञा तंगडेमोड करून जवळाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावात असलेल्या सबसेंटरला गेली होती; पण तिथं भलंमोठं कुलूप पाहून तशीच परत आली होती. नर्स भेटली असती तर निदान चार गोळ्या तापासाठी मिळाल्या असत्या व तिला घेऊन येता आलं असतं रमावहिनीची तब्येत दाखवायला; पण सबसेंटर कधीतरी उघडं असतं. कारण नर्स तालुक्याला राहते.

 सोजरमावशी निष्णात सुईण खरी; पण तीही गंभीर झाली होती. 'प्रज्ञा, पोरी, लई अवघड केस हाय तुझ्या वहिनीची. म्या शिकस्त करतेय पन् तिचा ताप

पाणी! पाणी!! / २०५