पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काही दिवस हा बहिष्कारही सहन केला; पण त्यामुळे जीवनगाडा चालेना. तशी त्यांनी पुन्हा आपल्या दलित नेत्यांना कल्पना दिली. त्याला पुन्हा वृत्तपत्रात मोठी प्रसिद्धी मिळाली. समाजकल्याणमंत्र्यांचा दट्टया आला व तहसीलदार गावात आले. त्यांनी शांतता समितीची बैठक घेऊन बहिष्कार उठविण्याचे आवाहन केलं. त्याला सवर्णांनी तोंडदेखला होकार भरला. पूर्वीइतका नाही, पण काही प्रमाणात का होईना बहिष्कार राहिलाच. शेतीत मजुरीचं काम आधी इतरांना द्यायचं; फारच गरज पडली तर दलितांना बोलवायचं. एकाही दलिताला उधारीवर माल द्यायचा नाही... अशा पद्धतीनं कोंडी चालूच होती.

 ही कोंडी फुटावी कशी? हा प्रश्न किसनभाऊंना व प्रज्ञाला पडायचा. त्यांची खलबतं, चर्चा व्हायची. कारण मुळातच गावात भीषण पाणीटंचाई होती व पाटलानं आपली खाजगी विहीर शासनानं पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करू नये म्हणून कोर्टाचा स्टे आणला होता. तिथं आता कुणाला हक्कानं पाणी भरता येत नव्हतं. पाटलाच्या मर्जीनं आजही सवर्णांना पाणी मिळायचं, पण दलितांना व विशेषतः नवबौद्धांना तो स्टे दाखवायचा व साळसूदपणे नकार द्यायचा. त्यामुळे काही करणं अवघड झालं होतं. त्यातूनच ही स्थलांतराची कल्पना पुढे आली. त्यांना निर्णय घेणे कठीण नव्हते. कारण कुणाचीच घरे पक्क्या स्वरूपाची नव्हती. साऱ्यांचीच काडाची पालं होती. एका दिवसात त्यांनी आपला कुटुंबकबिला व खटलं या उजाड पठारावरील माळरानावर हलवलं.

 प्रज्ञाला आताही हे सारं क्षणार्धात आठवलं आणि अंगावर काटा आला. केवढी जीवघेणी लाचारी! केवळ मागास जमातीचा कपाळी शिक्का म्हणून? का त्यातही आपले बांधव शिकत आहेत व मुख्य म्हणजे संघर्ष करीत आहेत- त्याची ही शिक्षा?'

 तिनं एक दीर्घ निःश्वास टाकला व पंचक्रोशी न्याहाळू लागली. दुपारच्या झगझगत्या उन्हात दूरवरही कोठे टँकर दिसत नव्हता. तिच्या पोटात भीतीचा गोळा सरकून गेला... कसे होणार रमावहिनीचं?

 आत झोपडीतून सतत विव्हळण्याचा स्वर येत होता. प्रज्ञाची वहिनी रमा अडली होती. कालपासून वेणा सुरू होत्या; पण अजून मोकळी झाली नव्हती. खरं तर प्रज्ञानं भीमदादाला अनेक वार म्हटलं होतं, जवळच जवळा बाजार आहे. तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रमाला डिलिव्हरीसाठी दाखल करावं म्हणून पण तिथं

पाणी! पाणी!! / २०३