पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रज्ञाचे डोळे आशेनं लकाकले. ती म्हणाली, ‘दादा, खरंच असं होईल? गावात असताना माझी बालवाडी नीट चालायची. इथं मात्र जिल्हा परिषदेची ग्रँट हवी. कारण इथं फी कोण देणार?'

 'व्हय पोरी, म्या सभापतीशी बोललूया परवाच. ते म्हणाले, जरूर परयत्न करू!'

 तिच्या आई-बापाचा विरोध असतानाही भीमदादाच्या प्रोत्साहनानं ती मॅट्रिकपर्यंत शिकली. एवढेच नव्हे, तर चांगल्या दुसऱ्या श्रेणीत पास झाली होती. तिनं मग बालवाडीचा सर्टिफिकेट कोर्स करून गावातच समाजमंदिरात बालवाडी सुरू केली होती. ती चांगली चालत असतानाच बहिष्काराचं प्रकरण उद्भवलं.

 त्यावर्षी गावात दुष्काळामुळे पाणीटंचाई होती. अजून टँकर सुरू व्हायचा होता. गावात एक खाजगी विहीर होती जुन्या मालीपाटलाच्या मालकीची. तिला भरपूर पाणी होतं. त्यावर सारं गाव पाणी प्यायचं; पण नवबौद्ध व इतर दलितांना पाणी स्वतःहून घ्यायला पाटलाची मनाई होती. त्यांचे दोन नोकर प्रत्येक घराला एक घागर पाणी शेंदून द्यायचे. हे सुशिक्षित प्रज्ञाला खटकलं होतं, पण ती चूप होती. मात्र काही दलित लोकांना त्यांची चीड आली होती. एका सभेसाठी पँथरचे काही नेते औरंगाबाद - नांदेडहून आले होते. जेव्हा हा प्रकार त्यांना समजला, तेव्हा त्यांनी जाहीर सभेत मालीपाटलाचा निषेध केला व दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात मोठी बातमी छापून आली.

 त्यामुळे चिडून जाऊन पाटलानं आपल्या विहिरीचं पाणीच साऱ्या दलितांसाठी बंद करून टाकलं! याचा जाब विचारायला किसनभाई मिलिंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आपल्या भाच्यासमवेत पाटलाकडे गेले असता त्यांना शिवीगाळ करून पाटलानं हाकलून लावलं, ‘जा, ही माझी विहीर आहे. मी माझ्या मर्जीनं पाणी देतोय. तुम्हाला काय करायचं ते करा.'

 तेव्हा किसनभाऊच्या भाच्यानं सरळ तालुक्यात जाऊन पोलिस स्टेशनमध्ये पी. सी. आर. ची केस केली आणि दुसऱ्या दिवशी पाटलाला अटक झाली. सारा गाव दलितांविरुद्ध खवळून उठला. त्यांनी त्यांचं काम व मजुरी बंद केली. पिठाच्या गिरणीत दळण मिळेना, की गावाच्या दुकानात किराणा मिळेना. त्या बहिष्कारानं त्यांची चांगलीच कोंडी झाली.

पाणी! पाणी!! / २०३