पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खरं तर आज ती त्याची वाटच पाहात होती. बऱ्याच दिवसांनी तिनं त्याच्या आवडीची न्याहरी बनवली होती. त्याला दही फार आवडायचं, म्हणून काल म्हशीचं दूध विकत घेऊन दही लावलं होतं. आणि शिळ्या भाकरी कुस्करून दही घालून लसणाची सणसणीत फोडणी दिली होती. महादूला ती फार आवडायची.

 सैन्यातून सेवानिवृत्ती घेतल्यावर गावी आल्यावर पहिल्या बाजारहाटाला तालुक्याहून त्यानं एक टेबलखुर्ची आणली होती. त्यावर बसूनच तो न्याहरी व जेवण करायचा. 'वाईफ, मांडी ठोकून बसत जेवायची सवय गेली बघ. आता टेबल खुर्चीविना जेवता येत नाही.' आवडाला त्याची ही कृतीही आवडायची. कारण खेडेगावात टेबलावर बसून ब्रेकफास्ट घेणारा तोच एकटा आहे, हाही तिच्या अभिमानाचा भाग होता. आपल्या मैत्रिणीला हे पुन्हा पुन्हा सांगताना तिच्या स्वरात अभिमान व नव-याविषयीचा आदर झळकायचा.

 आज तो नेहमीच्या सवयीनं टेबल-खुर्चीवर येऊन बसला. आवडानं वाडग्यात दह्या त कुस्करलेली व लसणाची खमंग फोडणी दिलेली शिळ्या भाकरीची न्याहरी ठेवली. पहिला घास घेताच गडगडाटी हसत तो 'वाईफ वा , क्या बात है!' असे उद्गार काढील अशी तिची अपेक्षा होती; कारण मागच्या मोसमात रोग होऊन बँकेचे कर्ज काढून घेतलेली म्हैस मेल्यापासून त्यांनी बकरीचं दूधच वापरायला सुरुवात केली होती. कारण महादूच्या लान्सनाईकपदाच्या तुटपुंज्या पेन्शनीत तेच परवडायचं. त्याला बकरीच्या दुधापासून बनवलेलं दही आवडत नसे, पण आताशी त्याची सवय झाली होती. पण काल तालुक्यात जाऊन त्यानं पेन्शन आणली तेव्हा तिनं खास म्हशीच दूध विकत घेऊन आजच्या न्याहरीसाठी दही बनवलं होतं.

 पण त्याचं न्याहरीकडे लक्ष नव्हतं. तो कितीवेळ तरी न्याहरीला सुरुवात न करता तसाच मूक बसून होता. मग भानावर येत त्यानं एक घास घेतला, पण काही न बोलता गाईनं संथपणे खाल्लेला चारा रवंथ करावा, तसा तो पहिलाच घास त्याच्या तोंडात फिरू लागला.

 आवडा त्याच्यासमोर गुडघ्यात पाय मोडून बसली होती आणि अस्वस्थपणे त्याच्याकडे एकटक पाहात होती. पण काही बोलायचा धीर होत नव्हता. महादूच आज काहीतरी बिघडलं आहे हे नक्की. त्याला वाटलं तर तो आपणहून सांगेल, नाहीतर तो हुं की चू करणार नाही, हे तिला माहीत होतं.

पाणी! पाणी!! / १८