पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






२. लढवय्या
 'वाईफ - भल्या पहाटे शेतात जाऊन अंग मोडून काम केल्यानंतर घरी येऊन तुझ्या हातची न्याहरी खाण्यात काही औरच मजा आहे बघ!' महादूचं हे पेटंट वाक्य असायचं. 'सैन्यात सकाळी पी.टी. केल्यानंतर ब्रेकफास्ट, इथं गावी शेतात जाऊन आल्यावर न्याहारी - वा, क्या बात है...' अशा वेळी आवडा खुदकन हसायची - प्रत्येक वेळी !

 ‘धन्याचं सारंच न्यारं असतं बाई' दुपारी चार बायकांत गप्पा मारताना आवडा सांगायची. ‘सारे शेतकरी शेतातच न्याहरी घेऊन जातात, पण त्यांना घरी येऊन गरमागरम खायचं असतं. ब्रेकफास्ट म्हणे...' इतर बायकांच्या आधी आवडाच तोंडाला पदर लावून खुसूखुसू हसायची. 'मला ते ‘वाईफ' म्हणून हाक मारतात सयांनो - विंग्रजीत...'

 आजही महादू नेहमीप्रमाणे भल्या पहाटे उठून शेतात गेला होता. नेहमीच्या वेळेला तो घरी सैन्यातल्या सवयीप्रमाणे लांब लांब ढांगा टाकीत आला तो मान टाकलेल्या बैलावाणी ! कधी नव्हे तो आज त्यानं दाढी करायला फाटा दिला- ‘हे आक्रीतच म्हणायचं बाई-' आवडा स्वतःशीच पुटपुटली. घोटून दाढी करणे व अक्कडबाज मिशा वळवणे, हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा क्रम होता. तो आज त्यानं चुकवला. तेव्हाच आवडाच्या ध्यानी आलं की, कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे.


लढवय्या /१७