पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/183

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ऑपरेशन तर आणखी चार - पाच केसेस फिस्कटतील. यावेळी साहेबांनी गुत्तेदारांना तयार करून प्रत्येक केसमागे साडी - चोळी द्यायचं निश्चित केलंय. तुमचं नाव मी नोंदवतोय.'

 तिनं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अंगठा करून पैसे घेतले,

 ‘लक्षात ठेवा, येत्या शुक्रवारी - जुम्मे को ऑपरेशन है....'

 तिनं केवळ मान हलवली व मैत्रिणींसह घरी परतली.

 उद्यापासून आठ दिवस ती कामाला जाणार नव्हती; कारण तिला ऑपरेशन करून घेणं परवडणारं नव्हतं. कारण कसाही झाला तरी तिचा हक्काचा संसार होता. तलाकशुदा जिंदगी तिला परवडणारी नव्हती. ते आयुष्य म्हणजे मुलींची उपासमार... कारण कादरनं फक्त मुलांना ठेवून घेऊन तिला व पाच मुलींना हाकलून दिलं असतं.

 तिचं मनच उतरलं होतं. कशातच रस वाटत नव्हता. त्याचा परिणाम तिच्या प्रकृत्तीवर झाला व तिला अधूनमधून बारीक बारीक ताप येऊ लागला होता.

 तिला त्या कामावर जावंसं वाटत नव्हतं. कारण दोन्ही वेळा शिबिरात तिनं ऑपरेशन करून घेतलं नव्हतं. मुकादम व त्या इंजिनिअरला तोंड कसं दाखवायचं, हा प्रश्न तिच्यापुढे होता.

 काम सुटलं, तसे पुन्हा फाके पडू लागले. कादरच्या कमाईचा मोठा वाटा दारूबाजीत व तालुक्याला ठेवलेल्या बाईत जात होता. त्यामुळे मुलांना धड दोन वेळा पोटभर जेवणही मिळत नव्हतं. मुलांच्या केविलवाणेपणाकडे अमिना दुर्लक्ष करीत होती.

 कादरनं तिला कामावर का जात नाहीस याबद्दल दोन - तीनदा विचारलंही तिच उत्तर ऐकून म्हणाला, 'वो पूछते हैं ऑपरेशन के बारे में तो पूछने दो. कोई जोर जबरदस्ती तो नहीं है इसके लिए... तू ना कह दे....!

 तिनं प्रत्युत्तर दिलं नाही; पण ती कामावरही गेली नाही.

 एके दिवशी दुपारी लंका तिला भेटायला आली. आज बाजार असल्यामुळे रोजगार हमीच्या कामाला सुट्टी होती.

अमिना/ १८१