पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 इंजिनिअर हळूहळू शांत झाले होते; पण त्यांच्या मनातला उद्वेग कमी झाला नव्हता. आजचा अनुभव काही वेगळा नव्हता. सर्वत्र हेच. पुरुषांना नसबंदी म्हणजे आपल्या पौरुषाचा अपमान वाटतो.

 पगारवाटपाच्या वेळी रांगेत उभ्या असलेल्या अमिनाच्या मनात मात्र अनेक विचारांची वादळ उठत होती.

 तिच्या लग्नाला अवघी दहा वर्षी झालेली; पण दरवर्षी होणाऱ्या बाळंतपणामुळे तिची रया पार गेलेली. कादरच्या शब्दात ती ‘चिपाड' झालेली.

 लग्नानंतरच्या नव्हाळीच्या दिवसांत कादर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा. तिचं अपरं नाक पाहून तिला ‘मुमताज' म्हणायचा. मुमताज ही त्याची आवडती नटी. तिचे सारे सिनेमे पाहायचा ‘गच्च भरी हुई है लौंडी' हे त्याच्या आवडीचं कारण. लग्नाच्या वेळी अमिनाही रसरशीत उफाड्याची होती; पण त्याच्या राक्षसी उपभोगाच्या पद्धतीमुळे व सततच्या बाळंतपणामुळे तिची तब्येत दोन वर्षांतच खालावून गेली.

 पहिल्या तीन - चार मुलांपर्यंत तिलाही कधी मुलं बंद होण्यासाठी काही उपाय करावेत, असं वाटलं नव्हतं. कारण त्यांच्या मुस्लिम मोहल्ल्यात सर्वच घरी पाच-सात मुलेबाळे ही आम बाब होती. जास्तीत जास्त मुले असावीत, ही इतरांप्रमाणे कादरचीही ओढ होती. पण तिला रात्री त्याच्या कुशीत झोपणं, तो देहभोग व ते गर्भारपणाचं ओझं आणि बाळंतपणाचा शारीरिक दुर्बलतेमुळे होणारा त्रास नको नकोसा वाटायचा.

 तिचा विरोध कादर जुमानत नसे. तो तिला चक्क धमकी देत असे, ‘मुझे क्या, कितनी बी बीबियाँ मिल सकती, तुझे तलाक दिया तो पोतेरा होगा तेरा - कोई नहीं पूछेगा. ऐसे बछडे सहित गाय से कौन शादी करेगा ?'

 ही भीती सार्थ होती. त्यामुळेच ती नेटानं त्याचे अत्याचार व दरवर्षीची बाळंतपणं सहन करीत होती.

 राजीवनगर घरकुल वसाहतीमध्ये त्यांना शासकीय घर मोफत मिळून गेलं. त्यांचा मुस्लिम मोहल्ला सुटला व संमिश्र वस्तीत ते राहायला आले. तिथं दलित होते, कुणबी होते, मातंग - वंजारी होते; पण तेच एकमात्र मुस्लिम कुटुंब होतं.

 इथं मात्र कादरनं तिच्यासाठी बुरखा व दाराला पडदा सक्तीचा केला होता.

अमिना / १७७