पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येईल, त्यांना शिक्षण देता येईल, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमचं दारिद्रय व अज्ञान हे कशामुळे आहे याचा विचार करा आणि निर्णय घ्या.'

 इंजिनिअरच्या स्वरात कळकळ होती. ती अमिनाला आजही जाणवली. मागेही जाणवली होती. म्हणून तर तिनं त्यावेळी शिबिरात नाव नोंदवलं होतं.

 ‘पन सायेब, हे ऑप्रेशन बायाचं हुईल का बाप्याचं ?' एक तरुण मजूर उठला व त्यानं प्रश्न विचारला.

 ‘दोघांचंही करता येतं; पण पुरुषाचं सोपं असतं.'

 ‘छा छा ! माझ्या बाईचं करा सायेब...' त्यानं ठामपणे सांगितलं, तसा तो इंजिनिअर उसळला व म्हणाला, पुरुषाचं का नको? ते उलट सोपं व कमी वेळेत होतं!'

 ‘पन आमची मर्दानगी कमी व्हते तेचं काय?'

 इंजिनिअर हतबुद्ध 'तुम्हाला किती वेळा समजावून सांगायचं? केवळ पोरं पैदा करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. यामुळे कसलाही विपरीत परिणाम होत नाही. मी स्वतः ऑपरेशन करून घेतलं आहे दोन मुलांवर. त्यावरून मी सांगतो.'

 'तुमी जीपमध्ये हिंडता सायब. आम्हास्नी मेहनत, मशागतीचं काम करावं लागतं. हे नाय जमणार बगा....!'

 आता मात्र इंजिनिअरची सहनशक्ती संपुष्टात आली होती. त्यांनी आवाज चढवीत मुकादमाला म्हटलं, 'या लोकांना तुम्ही त्यांच्या पद्धतीनं समजावून सांगा. हे चालणार नाही.'

 'साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी पाहतो. मुकादमानं साहेबाला शांत करीत त्यांना बाजूला नेत म्हटलं, 'साहेब, तुम्ही आकडा सांगा. तेवढ्या केसेस मी देतो. पण या गावची ही पुरुषमंडळी लई बिनडोक, साहेब, तेव्हा या केसेस बायांच्या होतील.'

 पैसे वाटणारा कनिष्ठ अभियंता म्हणाला, 'साहेब, सर्वत्र स्त्रियांच्याच केसेस होतात. आपल्याला केसेसशी मतलब आहे. साहेब, आम्ही दोघे या ठिकाणी पंचवीस केसेस निश्चित देतो बघा.'

पाणी! पाणी!! / १७६