पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अशिक्षित अमिना बोटे मुडपीत पुन्हा पुन्हा दोन पंधरवाड्यांचा मिळणारा पगार व बाळंतपणाचा भत्ता मिळून किती पैसे मिळतील याचा हिशोब करीत होती, पण प्रत्येक वेळी वेगळाच आकडा येत होता. एक निश्चित होतं की, मिळणारा पैसा किमान एक महिना तरी पोराबाळांना दोन वेळचं जेवण नीट देण्याइतका जरूर होता...

 त्यामुळे कितीतरी दिवसांनी अमिना खुलून आली होती.

 जेवायच्या सुट्टीमध्ये त्या चौघी भाकरतुकडा खात असताना मुकादमानं येऊन सूचना दिली की, कामावरचे मुख्य साहेब डेप्युटी इंजिनिअर आले आहेत. ते सर्वांना काहीतरी सांगणार आहेत. तरी जेवण होताच सर्वांनी जीप उभी आहे तिथं जमावं.

 अमिनाच्या मनात शंका चमकून गेली. पुन्हा मोठे साहेब ‘कुटुंब कल्याण बद्दल तर सांगणार नाहीत? तीन महिन्यांपूर्वी असेच ते आले होते व कामाच्या साईटवरच त्यांनी कुटुंब नियोजन शिबीर घेतले होते. त्यासाठी मेडिकल कॉलेजची फिरती व्हॅन - ज्यामध्ये ऑपरेशन करता येतं मागवली होती.

 त्या शिबिरात ऑपरेशन करून घेण्यासाठी अमिनानंही नाव नोंदवलं होतं पण...

 'चला चला... वेळ लावू नका... साहेबांना दुसऱ्या साईटवर जायचं आहे...' असा मुकादमानं कालवा केल्यामुळे अमिना आपल्या तिन्ही मैत्रिणींसह उठली.

 जीपमध्ये गॉगल लावून एक पोरसवदा वाटणारा अधिकारी बसला होता. त्या जीपसमोर काही मिनिटांतच दोन रांगा करून स्त्री व पुरुष अलग अलग उकिडवे बसले. मुकादमानं सर्वांना शांत केलं, तसं तो इंजिनिअर गॉगल काढून जीपच्या बाहेर आला. सर्वांकडे एक नजर टाकीत म्हणाला,

 ‘हे पहा, आपल्याला पुन्हा या महिन्यात कुटुंब कल्याणाचं शिबिर घ्यायचं आहे. तसा कलेक्टर व सी. ई. ओ साहेबांचा आदेश आहे. मागच्या मार्चमध्ये अनेकांनी नावे देऊनही ऑपरेशन करून घेतलं नाही, हे बरोबर नाही. आज पगार वाटप होताना सर्वानी आपल्याला किती मुलेबाळे आहेत, हे मुकादमाला सांगायचं आहे. ज्यांना तीनपेक्षा जास्त मुले असतील त्यांनी हे ऑपरेशन करून घ्यावं, अशी माझी विनंती आहे. त्यात तुमचाच फायदा आहे. लहान कुटुंब असेल तर मुलांना नीट वाढवता

अमिना / १७५