पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२. अमिना
 राणंद बुद्रुक गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या कडेला झालेल्या शासकीय घरकुलाच्या वसाहतीतील - ज्याचं राजीवनगर असं नामकरणही झालेलं आहे - कादरचं घर त्याच्यासमोर फडफडणांच्या कोंबड्यांच्या खुराड्यानं आणि तीन - चार बक-यांच्या इतस्ततः वावरणाऱ्या वास्तव्यानं सहज ओळखू येत असे.

 कादरच्या घराची दुसरी खूण म्हणजे त्या घराभोवती सदैव खेळणारी व मातीच्या रंगाशी एकरूप झालेली पाच-सहा कच्चीबच्ची. झिपरे केस, गळणारं नाक, चड्डी असेल तर शर्ट नाही, मूली चिटाच्या पोलक्यात. जरा मोठीच्या कडेवर रांगतं मुल - ज्यात प्रतिवर्षी भर पडणार हे साऱ्या राजीवनगराला ज्ञात असलेलं.

 पाच-सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या घराचा उडालेला चुना, घरासमोरच्या मोरीमुळे ओलसर व घाणेरडी झालेली जमीन, पत्रा उडून गेल्यामुळे तिथं केलेली शाकारणी, सतत पायात घोटाळणानऱ्या कोंबड्या व पिले आणि बक-यांचं इतस्ततः चरणं... यांच्या एकरूपतेतून कादरचा संसार साकार व्हायचा.

 दाराशी मात्र जीर्ण झालेला व विटलेल्या रंगाचा एक पडदा असायचा, जी अमिनासाठी सीमारेषा होती. त्याच्या आत ती बेपर्दा वावरायची, मात्र बाहेर पडताना असाच केव्हातरी घेतलेला, असंख्य ठिगळे जोडलेला व रफू केलेला बुरखा ती घ्यायची. अगदी रोजगार हमीच्या कामावर जातानाही. तिथं मात्र बुरखा काढूनच काम करणं भाग असायचं. खरं तर खेडेगावात पडद्याचा फारसा वापर नसतो; पण तालुक्याच्या

अमिना / १७१