पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 “तुम्हाला सांगतो साने साहेब, काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटतं. भीमराव नाईकचा बैल मेला. कारण इथं आला तेव्हाच तो रोगग्रस्त होता. त्याच्यावर औषधोपचार केला, पण तो वाचला नाही. भिडे गुरुजी नगरसेवक सानेंना सांगत होते.

 ‘पण गुरुजी, त्यात तुमचा काय दोष ? तुमचं रेकॉर्ड तर व्यवस्थित आहे. बाकीची जनावरे तर दृष्ट लागण्याइतपत सुदृढ दिसतात.'

 'नाही, साने साहेब. काही लोकांना उत्तम चाललेल्या गुरांच्या छावण्या नको आहेत, सलतात त्यांना. आजवर काही कुसळ मिळाले नाही. या निमित्ताने ते मिळणार व त्याला मुसळाएवढं रूप देऊन आपली - जनकल्याण समितीची आणि संघाची बदनामी काही जण करणार. हे सारं मला स्पष्ट दिसतंय.'

 'असं होणार नाही. गुरुजी, तुम्हाला या जिल्ह्यात सारे जाणतात. तुमचा स्वार्थत्याग, तुम्ही उभारलेले सेवाप्रकल्प... त्यांची नोंद देशपातळीवर आहे...'

 "पण आज या छावणीला तो हरामखोर वार्ताहर दिनेश सावंत आणि डी.पी. सी. चे सदस्य चाऊसशेठ भेट देऊन गेले. तसंच भीमरावलाही भेटले. त्यांच्या पेपरमध्ये विपर्यस्त बातमी येण्याची मला भीती वाटते.'

 'गुरुजी, आपल्याला हे लोक आज का झोडपत आहेत? त्यांच्या टीकेची का म्हणून पर्वा करावी?

 "ते ठीक आहे साने, पण यात त्यांनी कलेक्टर भावे साहेबांना गोवू नये म्हणजे मिळवली; पण...'

 आपलं वाक्य अर्धवट तोडीत गुरुजींनी खांदे उडवले आणि मनातले विचार झटकून टाकीत चा-याची पेंढी जनावरांना देऊ लागले.

 ‘शासनप्रणीत गुरांच्या छावणीत जनावरांची दुर्दशा !'

 'तरळदच्या छावणीत एका बैलाचा हेळसांडीमुळे मृत्यू !'

 'शेतक-यांत तीव्र नाराजी. आपली जनावरे ते छावण्यांतून काढून घेणार !

दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६७