पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याला दुष्काळाच्या निमित्ताने वार्तापत्र लिहिण्याचे आदेश संपादकानं दिले होते. त्यासाठी तो झटत होता. शासकीय कार्यालयातून माहिती घेतली होती व रोजगार हमी - पाणीटंचाईच्या संदर्भात काही गावं पालथी घातली होती. यंदा प्रशासनाने प्रभावी पावलं उचलल्यामुळे जरी टंचाईची समस्या असली तरी उपाययोजना तातडीनं घेऊन त्या कार्यक्षमतेनं राबविल्या जात असल्याचं दिनेशला दिसून आलं. हे सारं वार्तापत्रात नमूद करणं म्हणजे सरकारची री ओढण्यासारखं झालं, असं दिनेशला वाटत होतं. कुठेतरी प्रशासनाचा गलथानपणा दिसावा, म्हणजे तो भाग ‘हायलाईट' करून वार्तापत्र खमंग, चुरचरीत बनवता येईल. यासाठी दिनेश धडपडत होता, माहिती जमा करीत होता.

 आणि चौकामध्ये एक चहा मारून बाहेर पडताना त्याला त्याचा एक मित्र भेटला. हा कालच गावाकडून आला होता. त्यानं बातमी दिली की, त्याच्या गावी म्हणजे तरळदला गुरांच्या छावणीत एक बैल रोगग्रस्त होऊन मेला होता.

 दिनेश खुश झाला. त्याला 'क्लू' सापडला होता. मित्राच्या पाठीवर थाप देत तो म्हणाला, 'हे सरकार नुसतं नाटक करतं गुरांच्या छावण्या उघडण्याचं; पण देखभाल करीत नाही, काळजी घेत नाही.'

 'अंहं, तसं नाही दिनेश.' तो मित्र म्हणाला, 'अरे, तिथली गुरांची छावणी भिडे गुरुजी चालवतात जनकल्याण समितीच्या वतीनं. फार चांगली काळजी घेतली जाते यार ! पण काय झालं, चार दिवसापूर्वी आपल्या गावच्या भीमराव नाईकाचं एक जनावर छावणीत दाखल झालं. ते बिमारच होतं. त्याला औषधपाणी दिलं, पण काही उपयोग झाला नाही बघ.'

 मित्र निघून गेला आणि दिनेश भानावर आला. त्याच्या डोक्यात भराभर विचारचक्र फिरत होते. गुरांच्या छावणीत बैल दगावला ! ही छावणी जनकल्याण समितीची म्हणजे संघवाल्यांची. आपला पेपर कड़ा समाजवादी - डाव्या विचारसरणीचा. संघावर सदैव तुटून पडणारा. वार्तापत्रात हे सारं आलं तर किती मजा येईल! मोठं खमंग, चुरचुरीत वार्तापत्र होईल. संपादक महाशय खुश होतील... आणि मुख्य म्हणजे वार्तापत्रात केवळ सरकारच्या चांगल्या कामांची माहिती देण्याची वेळ आली होती, ती टळली.

दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६५