पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चाऊसशेठला हे माहीत होतं. खरं तर दुष्काळाच्या वेळी नेहमीच गुरांच्या छावण्या उघडण्याचे शासनाचे आदेश असतात. कुठेतरी साखर कारखान्याच्या परिसरात दोन चार छावण्या उघडल्या जातात. पण भावे साहेबांनी यंदा कमालच केली. स्वतः प्रत्येक तालुक्यात व महसूल मंडळात जाऊन तेथे चांगलं काम करणा-या संस्थांना प्रोत्साहित करून जवळपास चाळीस गुरांच्या छावण्या उघडल्या. त्यामुळे शेतक-यांनी जनावरे बेभाव विकण्याऐवजी ती छावण्यांमध्ये दाखल केली. परिणामतः कंपनीला या पंधरा दिवसांत एकही जनावर मिळालं नाही. तीन शिफ्टमध्ये कंपनी गेले दीड महिना चालू असताना आता जेमतेच एक शिफ्टचंच काम उरलं होत होतं - तेही इतर जिल्ह्यांतील जनावरांमुळे; पण त्यात वाहतूक खर्च फार होता.

 ‘अलनूर साहब आपसे सखुत नाराज है चाऊसशेठ.' हयातखान म्हणाला, ‘कुछ कीजिए, कुछ कीजिए. वर्ना कम्पनी आपकी खातिरदारी बंद कर देगी.'

 चाऊसशेठ संतप्त नजरेनं पाहात आहेत हे जाणवताच हयातखान सावरीत म्हणाला, 'ये साहब ने गुस्से में कहा होगा. हम उनको समझायेंगे. लेकिन सवाल हल नहीं होता इतने से. जूनपर्यंत कंपनीच्या तिन्ही शिफ्ट चालल्या पाहिजेत. गेल्या दोन वर्षातला लॉस भरून काढायचा हाच मौका आहे. कुछ करो शेठ, कुछ करो.'

 ते अलनूर साहेबांना चांगले ओळखून आहेत. त्यामुळे जरी हयातखानने सौम्य शब्दांत त्यांची नाराजी पोचवली असली तरी त्यामागची धग चाऊसशेठनं ताडली होती.

 आज त्यांना पूर्ण जिल्हा चाऊसशेठ म्हणून जाणतो. सत्ताधारी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे ते सचिव आहेत. एका परमिट रूमसह हॉटेल आणि दोन ट्रक व चार टेम्पोसह चालणारी ट्रान्स्पोर्ट कंपनी हे वैभव गेल्या चार-सहा वर्षातलं. त्याला कारणही अलनूर साहेब होते. त्यांनी चाऊसला कंपनीचा मुख्य एजंट बनवलं आणि कंपनीच्या कामात अडथळे न येण्यासाठी राजकीय - प्रशासनिक आघाडी सांभाळण्याचं काम दिलं. आजवर चाऊसशेठ अलनूरच्या कसोटीला सहजतेनं उतरले होते. त्यामुळे हातात पैसा खेळू लागला, समाजात पत वाढली आणि त्यांनी सत्ताधारी पक्षात ऊठबस सुरू करून स्वतःचं एक स्थान निर्माण केलं.

दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६३