पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/163

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 'शेतकरी बंधूंनो, पशुधन हे बळीराजाचं - शेतक-याचे भूषण आहे, वैभव आहे. ते साऱ्यांनी जपलं पाहिजे. यंदाचा दुष्काळ मोठा आहे. पाणी व चाराटंचाई प्रचंड आहे. पण त्यावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे. आपली गुरेढोरे आपण आम्ही स्वयंसेवी संस्थांमार्फत उघडलेल्या गुरांच्या छावणीत पाठवा. तेथे त्यांची उत्तम देखभाल केली जाईल. हे पशुधन शेतीसाठी अत्यावश्यक आहे. ते आपण पडत्या भावानं किंवा जनावरांना चारा घालता घेत नाही म्हणून बेभाव विकू नका. शासनाच्या वतीनं मी तुम्हास आश्वासन देतो की, तुमचं पशुधन आमच्या छावणीत सुरक्षित राहील. शेती हंगाम सुरू होताच ते परत पाठवू.'

 भावे गेले दोन दिवस जिल्ह्यामध्ये सतत फिरून गुरांच्या छावण्यांना भेट देत होते, गावात शेतक-यांशी बोलत होते. त्यांच्या अपेक्षेपेक्षा स्वयंसेवी संस्थांनी चांगल्या पद्धतीने गुरांच्या छावण्या चालवल्या होत्या.

 तरळद हे त्यांच्या दौ-यातलं शेवटचं गाव व अखेरची गुरांची छावणी होती. तेथे त्यांचं स्वागत भिडे गुरुजींनी केले व त्यांना गुरांची छावणी फिरुन दाखवली. सारी व्यवस्था चोख होती. गुरांच्या माथी छप्पर उभारून सावलीची सोय केली होती, चार मोठे हौद गुरांना पाणी पिण्यासाठी बांधले होते आणि जनकल्याण समितीने स्वखर्चाने बोअर घेऊन त्यावर मोटार बसवून पाण्याची सोय केली होती. गुरांसाठी लागणारी औषधीही पुरेशी होती. तेथे दाखल झालेली जनावरे अंग धरत होती.

 ‘वा गुरुजी ! फारच छान ! एवढी चांगली व्यवस्था शासनही करू शकणार नाही.' भावे म्हणाले, 'याचं एकच कारण मला दिसतं आपली निःस्वार्थ सेवावृत्ती आणि समाजाबद्दलचा कळवळा."

 ‘सर, माझी जादा तारीफ करू नका. तुमच्यावर संघाचा शिक्का बसेल." भिड्यांना मनमोकळ्या स्तुतीचाही स्वीकार करता येत नसे. ते आपल्या फटकळपणाला अनुसरून बोलून गेले.

 ‘ते मी जाणतो; पण तुमचं काम पाहिलं की वाटतं, हीं लेबले अनबॉरंटेड आहेत. प्रत्येक ठिकाणी इझम आणायची गरज नाही.'

 'आणखी दोन बाबी मला स्पष्ट करायच्या आहेत.' भिडे गुरुजी म्हणाले, 'एक तर या परिसरात अलनूर नावाची कंपनी आहे. बीफ एक्स्पोर्ट करण्याचा त्यांचा

दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६१