पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टर भावे यांनी दुष्काळात जनावरे मरु नयेत वा बेभावाने कत्तलखान्याकडे जाऊ नयेत म्हणून गुरांच्या छावण्या उघडण्यासाठी स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावलं होतं. अनेक संस्थांनी गुरांची छावणी उघडण्याची तयारी दर्शविली होती.

 जनकल्याण समितीचे भिडे गुरुजी हे लहानपणापासून संघाचे प्रचारक, या जिल्हयात गेली दोन तपे जनकल्याण समितीच्या माध्यमातून विविध सेवा प्रकल्प राबवत आहेत. एक निःस्वार्थी व सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते म्हणून सारे त्यांना मानतात.

 मात्र ते बोलायला फटकळ आहेत. 'सर, तुम्ही आम्हाला गुरांची छावणी उघडण्याची परवानगी दिली याबद्दल धन्यवाद ! यामागे आमचा हेतू शेतक-यांचे पशुधन नष्ट होऊ नये हा आहे. त्याचबरोबर गौरक्षण हाही आहे, हे मी कबूल करतो. त्यात मला संकोच वाटत नाही. सरकारदरबारी आम्ही अस्पृश्य ! म्हणून आधीच विचारतों. पुन्हा गैरसमज नकोत...'

 'गुरुजी, गुरांच्या छावणीत कसलं आलं आहे राजकारण व धार्मिकता ? जो कोणी यासाठी पुढे येईल, त्याला शासनाच्या वतीने चारा दिला जाईल. बाकी आपण करायचं. माझी काही हरकत नाही. आपण गुरांच्या छावण्या चालवायला घ्या.' भावे म्हणाले.

 या बैठकीला काही लोकप्रतिनिधीपण उपस्थित होते. काही आमदार व काही जिल्हा नियोजन व विकास मंडळ - डी. पी. डी. सी. चे सदस्य. आमदारांमधील शिवसेना - भाजप आमदारांनी भिडे गुरुजींच्या जनकल्याण समितीला तीन गुरांच्या छावण्या देण्याचे समर्थन केले. काँग्रेस आमदारांनी विरोध केला नाही. कारण भिडे गुरुजींच्या निःस्वार्थ कामाची त्यांना माहिती होती.

 सभेचा मूड पाहून डी. पी. सी. चे सदस्य असलेले व अल्पसंख्याक सेलचे सचिव असलेले चाऊसशेठ मात्र अस्वस्थ झाले, पण काही बोलू शकले नाहीत.

पाणी! पाणी!!/१६०