पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अल्तमश आणि हयातखान खुश होते. नुकताच मुंबईहून अलनूर साहेबांचा बधाईपर फोन आला होता. त्यांनी ठरवून दिलेलं उत्पादनाचं लक्ष्य पूर्ण व्हायच्या मार्गावर होतं आणि जवळपास दोन महिने होते जूनला. या काळात उत्पादन दुपटीएवढं व्हायची अपेक्षा होती. त्याबद्दल अल्तमश व हयातखानचं अलनूर साहेबांनी खास अभिनंदन केलं होतं आणि दोघांनाही बोनसव्यतिरिक्त दहा हजार रुपयांचा एक्स-ग्रेशिया मंजूर केला होता.

 अलनूरचं डोकंच मुळी अफलातून होतं. मुंबईत कन्स्ट्रक्शन कंपनीला काही 'डायव्हर्सिफिकेशन' असावं म्हणून आणि अरबस्तानातील बीफची वाढती मागणी व मार्केट पाहून त्यानं ही कंपनी मराठवाड्यासारख्या मागास भागात सुरू करण्याचं ठरवलं. त्यामागे अनेक हेतू होते. एक तर इथं जमीन स्वस्त होती. दुसरं मुबलक पाणी माफक दरात उपलब्ध होतं. याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे हा भाग कायम दुष्काळी म्हणून गणला जायचा. दोन-तीन मोसमात एखादा मोसम चांगला जायचा. बाकी दुष्काळ हा हमखास ठरलेला. अशा वेळी भरपूर जनावरे बेभाव मिळायची. त्यामुळे कंपनीला भरपूर नफा होणं सहज शक्य होतं.

 गेल्या दहा वर्षांत दोन वर्षांचा अपवाद वगळता अलनूरचा अंदाज कधी चुकला नाही.

 यंदाचा दुष्काळ हा दशकातला सर्वात उग्र दुष्काळ होता. म्हणूनच अलनूर कंपनी तिन्ही शिफ्टमध्ये पूर्ण क्षमतेने चालू होती.

 नेहमीपेक्षा यंदा तेथला दर्प जास्त उग्र व कडवट म्हणूनच असह्य होता.

 ‘सर, आपण जे आवाहन सर्व सेवाभावी संस्थांना केलं आहे, त्याला सारे जण आपापल्या परीनं प्रतिसाद देतील,' भिडे गुरुजी म्हणाले, 'पण आमच्या जनकल्याण समितीमार्फत आम्ही या जिल्ह्यात तीन ठिकाणी गुरांच्या छावण्या चालवूत. आमच्याकडे ध्येयवादी स्वयंसेवक तर आहेतच, पण प्रत्येक ठिकाणी दररोज तज्ज्ञ प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकारी भेटी देऊन जनावरे तपासतील व योग्य तो औषधोपचार करतील. मी तुम्हाला खात्री देतो की, इथं जी जनावरं येतील ती शेतक-यांना शेती

हंगामात पाऊस सुरू झाल्यावर धडधाकट व सशक्त अवस्थेत परत केली जातील.

दास्ता-ए-अलनूर कंपनी /१५९