पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'आता अल्तमशलाही चेव आलेला. हुजूर हम इस एरिया के हर जिले और तालुके में एजंट भेजेंगे. वो सौदा तय करेंगे और हमे जादा से जादा जानवर मिलने चाहिये...'

 'हुजूर...' शिदेही नकळत अल्तमश व हयातखानच्या पद्धतीने म्हणतो, 'हम पूरा साथ देंगे... लेकिन इस साल बोनस की रक्कम बढा दो...'

 ‘गये साल पंधरा परसेंट बोनस दिया था; इस साल पच्चीस दूंगा... लेकिन मशिन की पूरी कपॅसिटी युज होनी चाहिये' अलनूर म्हणाले, 'अल्तमश, प्रॉडक्शन टार्गेट फिक्स करो. हररोज कितना काम होना चाहिये ये सबको बता दो और उतना काम दिखाओ. बोनस मिल जायेगा...'

 यंदा मराठवाड्यात भयानक दुष्काळ पडलेला. पूर्ण खरीप पिके बुडालेली. पावसाअभावी रबीची तुरळक पैर झालेली. मुख्य म्हणजे पाणीटंचाईने उग्ररूप धारण केलेले!

 माणसांनाही पिण्याचे पाणी कमी पडत होतं. गावोगावी शासनाने टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू केलेला.

 शेतक-यांच्या जनावरांचे फार हाल होते. त्यांच्यासाठी चारा नव्हता आणि बाजारातून कडबा घ्यावा तर त्याचे भाव अस्मानाला भिडलेले. म्हणून न परवडणारे आणि रोख पैसा कुठे असतो शेतक-यांकडे?

 जनावरांना प्यायला पाणीही भरपूर लागतं. गावोगावी टँकरने पाणी पुरवले जायचं ते माणसांच्या संख्येप्रमाणे... जनावरांचा हिशोब जमेस नसायचा.

 शेतक-यापुढे जीवघेणा प्रश्न असायचा. जनावरं डोळ्यापुढे उपासानं व तहानेनं मरू द्यायची की विकायची?

 विकलं तर तेवढाच पैसा मीठ - मिर्चीला सुटायचा. दुष्काळाची धग त्या प्रमाणात कमी व्हायची.

 पुन्हा यंदा अलनूर कंपनीची माणसं गावोगावी येतात, सौदा करतात आणि मुख्य म्हणजे रोख पैसे देतात.

 शेतक-यांच्या डोळ्यापुढे हिरव्या कोऱ्या नोटा आणि जनावरांची करुण नजर फिरायची, पण सरशी व्हायची ती नोटांची.

पाणी! पाणी!! / १५८