पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करतात. यावर्षी कंपनीचा नफा भरपूर वाढेल. मी त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे.'

 समोरून शंभर-सव्वाशे जनावरे येत होती. “बोलाफुलाला गाठ पडते ती अशी... ही सारी जनावरे कंपनीत चाललीत बघ.'

 प्रदीप आपल्या सूटमध्ये दोन्ही तळव्यांची उशी करून त्यावर डोकं ठेवून पडला होता. नजर छतावरील नक्षी विमनस्कपणे निरखीत होती. मनावरचं मळभ कमी होत नव्हतं.

 त्याची ही घनभारली अवस्था परतीच्या प्रवासात कायम होती. त्याच्या पत्रकार मित्रांनी त्याला छेडायचा बराच प्रयत्न केला; पण त्याचं लक्ष नाही हे पाहून आवरती घेतली व त्याच्याकडे मग प्रवासात पूर्णपणे दुर्लक्षच केलं.

 मुंबईला परतल्यावर त्यानं कोरे कागद पुढे ओढले. आणि आपला आवडता पेन घेऊन लिहायला सुरुवात केली आणि मन मोकळं करायला सुरुवात केली. किती वेळ तरी तो लिहीत होता.

 जेव्हा दुष्काळ दौ-याचं वार्तापत्र लिहून झालं, त्यानं ते आपल्या मैत्रिणीला - सुमाला दाखवलं. तिनं ते वाचून उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली, ‘सिंपली सुपर्ब! या पद्धतीने दुष्काळाचं रिपोर्टिग कुणी केलं नसेल. हे जेव्हा प्रसिध्द होईल, तेव्हा वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतल्याविना ते राहाणार नाही...'

 प्रदीपनं ते वार्तापत्र संपादकाला दिलं व चहाच्या कपावर तो आपल्या अनुभवाबद्दल बोलतच राहिला. संपादक कदाचित खूप बिझी असावेत. ते केवळ ‘हो- नाही' च करीत होते. ते लक्षात येताच प्रदीपनं आपला बोलणं आवरतं घेतलं.

 पण ते त्याचं सुमाला बेहद्द आवडलेलं वार्तापत्र त्याच्या वृत्तपत्रात प्रसिध्द झालंच नाही. त्याऐवजी जिल्हा माहिती अधिका-यानं दिलेला कोरडा वृत्तांत प्रदीपचं नाव टाकून छापला गेला होता. त्याची महत्त्वाची ‘स्टोरी' सरळसरळ मारली गेली होती.

 प्रदीप घुश्शातच संपादकांकडे गेला व विचारलं. तसं थंडपणे संपादक म्हणाले, 'हा मालकांचा हुकूम होता. ते पालकमंत्र्यांचे स्नेही आहेत व त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क खातंही असल्यामुळे तुझं रिपोर्टिग छापून येणं त्यांना परवडणार नव्हतं.'

 ‘मग मला दौ-यावर पाठवलंच कशाला साहेब ?-'

पाणी! पाणी!!/१५२