पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही विहीर लोकांना पाणी रहाटानं भरण्यासाठी खुली आहे, अशी दवंडी पोलिस पाटलाला देण्याचा हुकूम दिला. ते निघताना जीपजवळ येत सरपंच म्हणाले,

 ‘पण साहेब, हे पाणी फार काळ टिकणार नाही. यापेक्षा टँकर लावला तर बरं...!'

 ‘सरपंच, पाणी कमी वाटतं का ? तसं असेल तर तुमचीपण विहीर अधिग्रहित करू का?' तहसीलदारांच्या हुकमी आवाजातील प्रश्नानं सरपंच भांबावले व क्षणभरानं सावरासावर करीत म्हणाले,

 'तसं नाही साहेब, हा माझा अंदाज आहे. त्या गंगवालच्या विहिरीचे पाणी आटलं तर माझी विहीर आहेच की...

 'ठीक ठीक....' आणि जीप सुरू झाली. ‘पाहिलंस प्रदीप, लोक खासकरून राजकारणी लोक कसे स्वार्थी असतात ते....'

 'खरं तर सरपंचांचीच विहीर अधिग्रहित करायची. त्यांना चांगला धडा शिकवायचा...'

 ‘माझ्या मनात ते का आलं नसेल' पण काही ग्राऊंड रिअॅलिटिज् पाहिल्या पाहिजेत. हा सरपंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा नातेवाईक आहे, त्याचं उपद्रवमूल्य बरंच आहे. मी त्यांची विहीर अधिग्रहित केली तरी लोकांना पाणी मिळालंच असतं, असं नाही. कारण तेही दडपणापोटी पाणी भरायला जाणार नाहीत. अशा परिस्थितीत दुसरी विहीर घेणंच योग्य वाटलं.. कारण पाणी मिळणं हे महत्त्वाचं नाही का?'

 ‘पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही राजकीय शक्तीपुढे झुकता?'

 ‘या कृतीमागे राजकारणाचा विचार जरूर आहे, पण महत्त्व आहे परिणामाला. लोकांना पाणी मिळायला हवं. इथं सरपंचाची विहीर मी अट्टहासान अधिग्रहित केली असती तर काय होईल? माझी शक्ती काही दिवस तरी या बाबीतच खर्ची पडेल? कारण हा पोलिटिकल प्रेशर आणेल. कदाचित मला मंत्र्यांचा फोन येईल... एवढं करूनही गावात त्याचं वजन लक्षात घेता लोक आपणहून त्या विहिरीवर जाणार नाहीत. प्रदीप, मोठं युध्द जिंकण्यासाठी लहानसहान चकमकी हराव्या लागतात कधी कधी.

 ‘ते या प्रकरणाला कसं लागू होतं?'

पाणी! पाणी!! / १५०