पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचा तालुका... दुष्काळाची व दारिद्र्याची शान पिढ्यानपिढ्या कपाळावर मिरवणारी, ती मूक सोशिक माणसे...

 आणि जवळच समृध्दीचा व पाण्यानं ओसंडणारा कराड, फलटण तालुका व त्यांची ऊस-शेती पाहिली, की प्रदीपला ती विषमता अधिकच जाणवायची. प्रगत विज्ञानाच्या काळात या भागातलं जादा पाणी माण-खटावमध्ये का आणता येत नाही, या प्रश्नाचं उत्तर त्याला तेव्हाही सापडलं नव्हतं व आजही माहीत नव्हतं.

 हे सारं त्याला रोटेगाव स्टेशनवर त्या अनाम शेतक-याशी झालेल्या संभाषणातून जाणवणाच्या दाहक दुष्काळाच्या जाणिवेनं आठवत होतं मनात नानाविध प्रश्नांची भेंडोळी गरगरत होती आणि एक प्रकारचा सुन्नपणा त्याला आला होता.

 औरंगाबादला पालकमंत्र्यांच्या पी. ए. नं व जिल्हा माहिती अधिका-यानं मुंबईच्या पत्रकारांचे जंगी स्वागत केलं होतं. त्यांच्या वाहनांची चोख व्यवस्था होती व त्यांची निवासव्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती. सारं काही चोख होतं- तरीही प्रदीपचा मूड येत नव्हता.

 उलट त्या वातानुकूलित हॉटेलच्या श्रीमंती थाटामाटाचा, उत्तम भोजनाचा आणि सरबराईचा प्रदीपला सूक्ष्म पण खोल असा तिटकारा जाणवत होता. त्याच्या नजरेसमोर न पाहिलेली रोटेगाव-वैजापूर परिसरातली वाळलेली बाजरीची शेते येत होती आणी घास तोंडात फिरत होता.

 दुपारी पालकमंत्र्यांनी साऱ्या पत्रकारांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी होते. त्यांना सविस्तरपणे जिल्ह्यात पडलेला भीषण दुष्काळ व त्यावर मात करण्यासाठी केलेले नियोजनबध्द प्रयत्न विशद करण्यात आले. केंद्र शासनाकडून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कमी मिळणाऱ्या मदतनिधीमुळे अनेक उपाययोजना करता येत नव्हत्या, हेही त्यांनी आकडेवारीसह सांगितलं. सारे पत्रकार भराभर टिपणं घेत होते. प्रदीपही यांत्रिकतेनं आकडेवारी आपल्या नोटबुकमध्ये टिपून घेत होता. त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळत नव्हती.

 पालकमंत्र्यांचं ‘ब्राफिंग' संपल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सारेच जुजबी - वरवरचे प्रश्न, त्याला आकडेवारीतून दिलेलं तेवढंच निर्जीव उत्तर.. मूलभूत समस्येबद्दल कोणीच विचारत नव्हतं. प्रदीपला राहावलं नाही, त्यानं हात वर करीत प्रश्न फेकला,

 महोदय, हे सारे प्रयत्न केवळ मलमपट्टी या स्वरूपाचे नाहीत का? कारण गेल्या वीस वर्षांत किमान चार ते पाच वेळा असा भीषण दुष्काळ महाराष्ट्रात पडलेला आहे व पंचाहत्तर - सत्याहत्तरपासून रोजगार हमी योजना लागू आहे. तरीही प्रत्येक

दौरा / १४३