पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मग पहाटे केव्हा तरी रमीचा डाव संपवून ते सारे निद्राधीन झाले. आणि इतका वेळ वरच्या बर्थवर डोळे मिटून झोपेची वाट पाहणा-या पण त्यांच्या गलक्यानं व चित्रविचित्र आवाजानं ती न येणाऱ्या प्रदीपनं सुटकेचा निःश्वास टाकला. मग त्यालाही झोप लागली.

 रात्री केव्हाही व कितीही उशिरा झोपले तरी प्रदीपला सकाळी सहा वाजता हुकमी जाग यायची. आजही त्यानं डोळे उघडून सभोवती पाहिलं, तेव्हा त्याचे सर्व पत्रकारबंधू अस्ताव्यस्त घोरत पडलेले होते.

 जाग आली खरी; पण करावं काय हा प्रश्न होता. हलत्या गाडीत बर्थवर पडून वाचणं त्याला जमत नसे. त्यामुळे गाडी थांबलेली पाहताच त्यानं संधी साधली. त्या अनाम शेतकऱ्याशी गप्पा मारताना वेळ बरा जात होता आणि दुष्काळाची बरीच माहिती मिळत होती.

 प्रदीप त्या शेतकऱ्यासमवेत रोटेगावचा कळकट चहा तुटक्या कपबशीतून प्याला. तो अखंड बोलत होता व त्यातून जाणवणारं दुष्काळाचं चित्र प्रदीपला भयावह वाटत होतं.

 न पिकलेली शेती, पिण्याच्या पाण्याची समस्या, हाताला काम नाही म्हणून रिकामी पोटं, रोजगार हमीची तुटपुंजी कामे, रेशन दुकानदाराची मनमानी म्हणून, धान्य वेळेचर नाही.. या साऱ्यातून एक कडवट, काळ्या - करड्या रंगांचं चित्र उभं राहात होतं.

 औरंगाबाद आलं तरी प्रदीप आपल्यातच दंग होता. त्याला त्याच्या बालपणातला पंधरा - सोळा वर्षापूर्वीचा माणदेश आठवत होता. म्हसवडजवळ आकाशवाडी त्याचं गाव, पण म्हसवडला घर होतं. बहात्तरच्या दुष्काळात म्हसवड व तो सारा माण तालुका होरपळून गेला होता. ती अभावाची दाहकता शाळकरी प्रदीपला त्या वेळीही जाणवत होती व त्याची छाप आजही मनावर अमीट होती.

 कॉलेजला असताना सहलीच्या निमित्तानं त्यानं उत्तर भारत पालथा घातला होता. पंजाब - हरियानाची हिरवी श्रीमंती आणि तुडुंब भरून बारमाही वाहणाऱ्या गंगा - यमुना या नद्या पाहिल्या, की त्याचं मन उदास व्हायचं. एक पावसाचा मोठा सडाका आला, की दोन दिवस लाल माती घेऊन खळाळणारी व इतर वेळी बहुतेक कोरडी असणारी माणगंगा आठवायची, जिचा उपयोग आता फक्त पहाटे परसाकडसाठीच व्हायचा. फक्त बाजरी पिकवणारी त्याच्या भागाची बंजर जमीन व पर्जनक्षेत्र असल्यामुळे, कमी पावसामुळे दुष्काळी तालुक्यात मुकुटमणी शोभेल असा

पाणी! पाणी!!! /१४२