पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळात किती व कसं काम केलं आहे हे दाखवणं व केंद्रीय निरीक्षण तुकडी जी पुढील आठवड्यात दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी राज्यात येत होती, त्यांच्यापुढे त्याची समग्रता दाखवून अधिकाधिक केंद्रीय मदत मागण्यासाठी पार्श्वभूमी करण्यासाठी हा मुंबईच्या पत्रकारांचा दौरा होता. मराठी, इंग्रजी व गुजराथी पत्रकार त्यात होते. या सा-या ज्येष्ठ पत्रकारांबरोबर दौरा करण्याचं 'थ्रिल' प्रदीपला जाणवत होतं.

 महाविद्यालयीन शिक्षण व नोकरीच्या निमित्तानं जरी गेल्या दहा-बारा वर्षांत प्रदीप मुंबईकर झाला असला, तरी मूळचा तो माणदेशाचा. दुष्काळी भागातच तो लहानाचा मोठा झाला, म्हणून त्याला दुष्काळ, नापीक शेती व पाण्याचा प्रश्न या समस्यांबाबत रस होता व त्याला त्यानं पद्धतशीर वाचनाची जोडही दिली होती. आज या दौ-याच्या निमित्तानं त्याचा जुना माणदेशी अनुभव व केलेला अभ्यास त्याला तपासून पाहायचा होता व वेगळा, अभ्यासू वृत्तांत वाचकांपुढे सादर करायचा होता.

 यानिमित्ताने दौ-याच्या वेळी इतर ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करावी, असा त्याचा मानस होता; पण एक्स्प्रेसनं मुंबई सोडली, तसं साऱ्यांचं खाणं, पिणं, टवाळकी, अश्लील जोक्स सुरू झाले. मद्याच्या बाटल्या फुटल्या. सिग्रेटीच्या धुराने तो फर्स्ट क्लासचा पूर्ण रिझर्व्ह केलेला डबा भरून गेला. एक्स्प्रेसचा रामन व ‘टाइम्स'ची ज्युथिका पेपरची ‘रायव्हल्सी' विसरून एकमेकांच्या जोक्सना टाळ्या देत दाद देत होते, तर हिंदुत्वनिष्ठ दाते व उर्दू पत्रकार रहेमान एकमेकाना ‘शिवास रिगल' चा आग्रह करीत होते. ज्योत्स्ना खुमासदारपणे अफलातून चावट जोक्स पेश करीत होती. सारे वातावरण कसे सहलीला निघाल्यासारखे होते. त्यांच्या चर्चेचे विषय पण वैयक्तिक व मुंबई वर्तुळातले होते. ज्या भागात व ज्या कामासाठी आपण जात आहोत, तो विषय चुकूनही गप्पांमध्ये येत नव्हता.

 नवखा प्रदीप भांबावून गेला होता. तो ‘टीटोटलर' असल्यामुळे कंपनीतही अलग पडत होता. बाकीचे त्याची खिल्ली उडवीत होते. त्यामुळे तो अधिकाधिक बावरत होता, तसतसा त्यांना जास्तच जोर चढत होता.

 तशातच कुणीतरी पत्त्यांचा कॅट काढला आणि पाहता पाहता रमीचा डाव रंगत गेला. हातात स्कॉच वा ‘शिवास रिगल' आणि ओठात ‘कॅप्टन'ची सिगारेट अखंड जळत होती.

दौरा / १४१