पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'दुष्काळ तर हाय बगा लई नामी यंदा तर पाणी बरसलंच नाही...' तो शेतकरी सांगत होता, ‘पन मला येक कळत न्हाई, तुमी दुष्काळ बघून काय करणार?'

 ‘आमच्या पेपरात लिहिणार काय काय पाहिलं ते.'

 ‘त्येनं काय व्हणार?'

 या प्रश्नाची चपराक प्रदीपला चांगलीच जाणवली. त्याच्याजवळ खरंच या प्रश्नाचं काही उत्तर नव्हतं.

 ‘मिरगाला बखळ टाइम हाय, तोवर जंतेचे हाल हायत बघा.'

 'तुम्हाला दुष्काळाची झळ बसली आहे?' हा प्रश्न त्यानं चाचरतच विचारला, आणि त्याला स्वतःलाच जाणवलं, किती निरर्थक प्रश्न आहे हा. तो अनाम शेतकरी तर मूर्तिमंत दुष्काळ वाटत होता.

 ‘मंग? या गावातल्या परत्येक शेतकरी व मजुराला त्याची झळ बसलीय की. आवो, पाणीच बरसलं नाही तर शेती पिकेल कशी? हा सारा मुलूक कोरडवाहू. निस्ती बाजरी पिकते. आवंदा ह्ये पीकबी चार आणेसुद्धा पदरी पडलं नाय बघा...'

 आता तो शेतकरी चांगलाच मोकळा झाला होता. प्रदीपमधील पत्रकारही खुलून आला होता. जो दुष्काळ त्याला पालकमंत्री व सरकारी अधिका-याच्या नजरेनं पाहून रिपोर्टिंग करायचं होतं, त्यापलीकडे जाऊन पत्रकारी भाषेत ज्याला 'फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन' म्हणता येईल अशी माहिती अगदी सहजपणे रोटेगावच्या प्लॅटफॉर्मवर त्या अनाम शेतकंन्याशी गप्पा मारताना त्याला मिळत होती. त्याचा गंधही इतर पत्रकारांना नव्हता.

 त्यानं काहीसं सुखावून व अभिमानानं आत डब्याकडे नजर टाकली. सारे पत्रकार मस्तपैकी घोरत होते. 'फ्री प्रेस' ची स्त्री पत्रकार ज्योत्सनाही इतर पुरुष पत्रकाराच्या सुरात सूर मिसळून घोरत होती. प्रदीपला त्याची गंमत वाटली. स्त्रीपण घोरते, हे पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारलेल्या पण अजूनही मूळची ललितलेखनाची प्रवृत्ती असलेल्या प्रदीपला धक्कादायकच होतं.

 या पत्रकार दौ-यासाठी त्याची निवड अनपेक्षित होती. त्याच्या पेपरचे चीफ रिपोर्टर मुख्यमंत्र्यांबरोबर विदर्भात गेले होते, तेव्हा त्याला औरंगाबादला जाण्यास फर्मावण्यात आलं. त्याच्या तीन वर्षांच्या पत्रकारितेमधला हा पहिलाच दौरा होता. ची ख्याती ‘सहकारसम्राट' अशी होती, अशा एका मंत्र्यानं आपल्या जिल्ह्यात या

पाणी! पाणी!! / १४०