पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/134

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 तो परत कमानीपाशी आला, तेव्हा अख्खं गाव जमा झालं होतं. पाटील त्याला म्हणाले, 'साहेब, दोन सबुद बोला गावासाठी. त्येस्नी तेवढंच बरं वाटेल.'

 'काय बोलायचे पाटील? मला स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून घ्यायची शरम वाटतेय. आम्ही लोकांनी व शासनानं काय केलं तुमच्यासाठी आजवर?आम्हाला काय अधिकार पोचतो तुम्हाला उपदेश करायचा?' जगदीशच्या आवाजात कंप, अपराधीपणा आणि विषाद होता.

 'आसं कसं सायेब? तुम्ही तालुकदार.. अव्वल सायेब.. त्या निजामाच्या मुनसफनंतर तुमी गावाला भेट देणारे दुसरे सायेब...' पाटलानं मधल्या काळात घरी जाऊन एक जुनी चोपडी आणली होती. 'सायेब, हे पहा व्हिजिट बुक... लई जुनं हाय, पन ते भरलंच नाही... यात बगा दोन - तीनच नोंदी हायत.'

 जगदीशनं ती जीर्ण चोपडीवजा वही कुतूहलानं अलगदपणे उघडली. त्यात निजामाच्या मुनसफची उर्दू भाषेतली नोंद होती. सर्वप्रथम...

 'या नोंदीत काय लिहिलंय ?"

 'मी वाचून दाखवू का?' पाटील म्हणाले, 'सायेब, म्या साळंत उर्दूच शिकलो... मला येतं वाचायला?”

 'वाचून दाखवू नका - मला उर्दू समजत नाही. तुम्ही फक्त अर्थ सांगा.'

 'सायेब, मुनसफसायबानं लिहिलंयः डोंगराच्या कुशीतलं हे गाव लई सुंदर हाय, इथली आंब्याची झाडे, दरीतून वाहणारा छोटा ओढा व गावामंदी टणाटणी उड्या मारीत पळणारी हरणं पाहून आनंद वाटला. गावचे लोकही चांगले च भले हायेत, हे पाहून समादान वाटलं....'

 जगदीश जे पाहात होता, अनुभवत होता, त्यापेक्षा हे काही वेगळंच लिहून ठेवलं होतं चाळीस वर्षापूर्वी भेट देणा-या निजामाच्या मुनसफनं. 'पाटील हे जे मुनसफनं तेव्हाच्या तहसीलदारानं लिहिलंय ते खरं होतं ?'

 'व्हय सायेब, म्या तवा न्हान होतो. तवा हे सारं व्हतं... पन वरच्या गावी जमीनदारानं बांध घातला आन् व्हता वढा आटला. तवापासून पान्याचे भोग सुरू झाले. मग आले जागिरदार,.. त्यांची ही नोंद मराठीत आहे, ती वाचा साहेब...'

 जुन्या मोडी वळणाचं, लफ्फेदार वळणाचं ते मराठी जगदीश वाचू लागला...

पाणी! पाणी!! / १३२