पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पाटील क्षणभर जुन्या आठवणीत रंगले होते. मग उसासा टाकीत ते म्हणाले, ‘गावानं तेच्यापुढे पाण्याची आडचण मांडली, तवा जागिरदार म्हणाले, 'म्या तुमा गावक-यांवर खूस हाय... म्या गावात हीर बांधण्यासाठी दोनशे रुपये धाडून देतो... बांदून घ्यावी...' साहेब त्या येळेला दोनशे रुपये मोप होते... त्यातून हीर बांधली गेली... आदी आदी लई चवदार, निवळशंख पानी होतं... थंडगार... भर उन्हात ते पिलं की गार गार वाटायचं... पण नंतर ह्या पाण्यात नारूचे जंतू झाले... आनी गावात रोगराईचा शाप सुरू झाला...'

 चालता चालता बोट दाखवीत ते म्हणाले, 'ही पाहा विहीर सायेब...'

 जगदीश पुढे झाला... विहीर कच्ची बांधलेली होती. एका बाजूने ढासळलेली, तर दुस-या बाजूने कच्च्या पाय-या असलेली अशी होती. त्यामुळे कुणालाही विहिरीत उतरून खाली पाण्यापर्यंत जाता येत होतं... त्यानं वाकून पाहिलं... विहिरीत पाणी होतं, गढुळलेलं... तिथं एक स्त्री घागर बुडवून पाणी घेत होती. ती पाय-या चढून वर आली, तेव्हा पाटलानं तिला थांबवलं व तिच्या घागरीतलं पाणी आपल्या ओजळीत घेतलं. ती पाण्याने भरलेली ओंजळ जगदीशपुढे करीत ते म्हणाले,

 'नीट पहा सायेब, उघड्या डोळ्यानं नारूचे जंतू दिसतील या पाण्यात...

 जगदीश थरारला, त्यानं पाहिलं, त्या ओंजळीतल्या पाण्यातही चार-सहा नारूचे पांढ-या दोन्यासारखे जंतू वळवळत होते.

 मुळापासून अंतर्बाह्य हादरणं म्हणजे काय असतं, याची जाणीव जगदीशला क्षणार्धात झाली. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो काहीसा थरकापलाही. हे सारं केवळ अतर्क्य, कल्पनेच्या पलीकडलं होतं.

 ‘हे असंच पाणी गावकरी पितात देसाई साहेब...' डॉक्टर म्हणाले, ‘मागच्या आठवड्यात मी आलो होतो, तेव्हा माझीपण हीच अवस्था झाली होती. इथं प्रत्येक घरात जवळपास प्रतेकाला नारू केव्हा न केव्हा झाला आहे. इतके दिवस इम्युन असलेले पाटीलही आता नारूग्रस्त झाले आहेत.'

 त्यानंतरच्या अर्ध्या तासात जगदीशनं पूर्ण गाव पालथं घातलं. इनमिन दीडशे घराचं ते छोटं गाव होतं, पण प्रत्येक माणसाच्या पायात नारूची जखम दिसत होती, त्या जखमेतून नारूचे जंतू पडत होते. त्याची त्यांना सवयच झाली होती...

नारूवाडी / १३१