पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण हा नवा डॉक्टर सहकुटुंब राहात होता आणि गावक-यांमध्ये बराच लोकप्रिय होता. त्याची सेवावृत्ती व ध्येयवाद अपवादसम होता. जगदीशलाही त्याला भेटायचं होतं. आज अनायासे स्वतः डॉक्टरच त्याला भेटायला आले होते.

 प्राथमिक चर्चेनंतर व्यवसायाचे विषय निघाले... ‘मला ठाऊक आहे, डॉक्टर, तुमचं कुटुंब कल्याणचं टार्गेट जानेवारीतच पूर्ण झालं आहे; पण तालुका अॅज सच मागे पडतोय. इतर पी. एच. सी.ज् आणि विशेषतः रूरल हॉस्पिटलचं काम फार कमी आहे. कॅन यू काँट्रिब्यूट ?'

 'व्हाय नॉट?- एका गावाबद्दल मला विशेषकरून बोलायचं आहे... इराची वाडी. तिथली पाणी समस्या फार भीषण आहे. तेथे लोकांना प्यायचं शुध्द पाणी मिळत नाही. एक जुनी सामुदायिक विहीर आहे; पण तेथे नारूचे जंतू आहेत... आणि भयंकर बाब अशी की, लोक नाइलाजानं चक्क तेच पाणी पितात....!'

 जगदीशच्या अंगावर नुसत्या कल्पनेनंही सरसरून काटा आला.

 ‘मी अतिशयोक्ती करत नाही देसाईसाहेब... मी नुकताच त्या गावी जाऊन आलो आहे आणि तिथं घरटी एक तरी नारूनं आज पिडलेला आहे आणि गावात असा एकही माणूस नसेल की त्याला कधी तरी - केव्हा तरी नारू झाला नसेल.'

 जगदीश अस्वस्थ झाला होता. तो शासनाचा एक उच्चपदस्थ अधिकारी. घरी प्यायला शुद्ध फिल्टर्ड पाणी. स्नानाला थंड व गरम पाण्याचा शॉवर. प्रवासात मिल्टनच्या थर्मासमध्ये आइसकोल्ड पाणी. अशा प्रखर उन्हाळ्यात प्रवास करताना ते पिणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद वाटायचा... आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील एक अख्खं गाव नारूच्या जंतूंनी बटबटलेलं पाणी पितं आणि रोगग्रस्त होतं... किती भयंकर, किती विषादपूर्ण !

 गेले दोन महिने जगदीश इथे आहे; पण या काळात आपल्या कार्यक्षेत्रात इराची वाडी नामक गाव आहे हे त्याला आजच कळलं, तेही या स्वरूपात...

 तो उठला आणि म्हणाला, 'डॉक्टर... मी आताच त्या गावी जाऊ इच्छितो तुम्ही येऊ शकाल?'

 ‘जरूर, पण प्रांतसाहेब गावाला रस्ता नाही. किमान दोन ते अडीच किलोमीटर चालावं लागेल.'

 ‘माझी तयारी आहे. लेट अस् गो....!'

पाणी! पाणी!!/१२८