पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 घरी आल्यावर भय्यानं वडिलापुढे आपलं मन खुलं केलं. त्याचे वडील बाप्पासाहेब हेही चंपकशेठप्रमाणे वयोवृध्द होऊन घरीच बसले असले, तरी उभी हयात राजकारणात गेल्यामुळे त्यांचा मेंदू आजही तल्लख होता.

 क्षणभर त्यांनी विचारमग्न होतं डोळे मिटून घेतले, तेव्हा भय्यानं ओळखलं आता आपल्या समस्येवर गुरुकिल्ली सापडतेय. बाप्पासाहेब योग्य वेळी अचूक निर्णय घेतात व राजकारणात ते कधीही खेळी चुकत नाहीत, असा त्यांचा लौकिक होता.

 एका रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं होतं. चंपकशेठचा तो हिरवाकंच मळा साफ उद्ध्वस्त झाला होता. सबंध बारा एकरांच्या तुकड्याला दलपतनं अमाप पैसा खचून बांधलेलं काटेरी तारेचे कुंपण पूर्णपणे मोडून काढलं गेलं होतं. त्या हिरव्यागार शेतामध्ये शेकडो बैल व गुरे रात्रभर मनमुराद चरल्यामुळे उभं पीक नष्ट झालं होतं. विहिरीवर बसवलेल्या मोटारीची दुरुस्तीपलीकडे मोडतोड झाली होती. त्या मळ्याचा हिरवा दिमाख व दलपत - चंपकशेठचा पैशाचा रुबाब रात्रीतून ओसरला होता.

 पोलिस पंचनामा चालू होता, तहसीलदारही येऊन गेले होते. दूर अंतरावर लोक घोळक्या-घोळक्यात उभे होते.

 स्त्रियांच्या घोळक्यात रखमा - भीमी याही होत्या. त्यांच्या व इतर स्त्रियांच्या किंवहुना पूर्ण बुद्धवाड्याच्या प्रतिक्रिया समान होत्या.

 ‘बेस झालं ! आमची वाट मोकळी झाली....'

 ‘लई दिमाख होता दलपतला पैशाचा व या जमिनीचा.. पण गाव उलटलं की काय व्हतं हे आता तेस्नी समजून ईल...!'

 ‘पाण्यासाठी समद्या गावास्नी तरास दिला. भोग म्हना आता त्येची फळं....

 ‘हा तर मोठा चोर हाय, पानी-चोर... समद्या गावाचं पानी ह्येच्या हिरीनं ओढून घेतलं... वंगाळ, लई वंगाळ... वर देव हाय- त्यो साऱ्यांचा हिसाब ठेवतो बाप्पा....' एक माळकरी वृध्द शेतकरी पुन्हा पुन्हा सांगत होता...

 त्यांचं बोलणं ऐकणाऱ्यांत परशूदादाही होता. त्याच्या डोळ्यातला हिरवा सर्प शांत झाला होता. आता त्याची एकच इच्छा होती - चंपकशेठच्या भरल्या विहिरीत एकदा मस्त उडी मारून मनसोक्त पोहण्याची व तप्त शरीर शांत करण्याची...

 रखमाला काळाठिक्कर पडलेल्या दलपतकडे पाहाताना एक अनामिक शांती लाभत होती. एक सूडाचं समाधान लाभत होतं. तिच्या पृष्ठभागाला त्या दिवशी त्याची पडलेली ओंगळ व वासनालब्ध मिठी व तिचा असह्य स्पर्श मिटून गेला होता. पुन्हा ती न्हातीधुती होऊन निर्मळ झाली होती.

पाणी! पाणी!!/१२२