पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/120

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 परशूदादा असेल कुणब्याचा. परवा मला बाजारात गरजावैनी भेटली होती. सध्या शेठजीच्या मळ्यात परशूदादा सालगडी आहे म्हणे-

 ‘आगं पन रखमे–' भीमीला पुढे न बोलू देता रखमा म्हणाली, “पणबिण काही नाही. मी आत्ता येते बघ.' तिनं आपला ओचा गच्च केला. काटे टोचणार नाहीत या बेतानं तारेवर पाय ठेवीत वर चढली आणि पलीकडे मळ्यात उडी मारली.

 हरभरा व गव्हाच्या ओंब्यांतून वाट काढीत रखमा सरळ विहिरीजवळ आली, पण परशू काही दिसला नाही. कदाचित घरी भाकरतुकडा खायला गेला असावा. त्याची म्हातारी तिच्या भावाकडे दहिफळला गेली आहे, घरी वहिनी एकटीच आहे... या विचारानं रखमाला नकळत खुदकन हसू आलं.

 ‘वा S-- काय माल आहे?' आवाजातून लाळेप्रमाणे वासना टपकत होती. रखमा दचकली, शहारली आणि पाहता पाहता संतप्त झाली.

 समोर एक मवालीटाईप तरुण उभा होता. अंगात शहरी कपडे - टी शर्ट, जीन पॅट होती. क्षणार्धात रखमाला ओळख पटली... हा तर चंपकशेठचा वाया गेलेला दलपत होता. कधीकाळी तिच्या वर्गात होता, पण नापास झाल्यामुळे मागे पडला होता.

 ‘दलपत तू? अरे, किती घाण बोलतोस? शरम नाही वाटत?'

 रखमानं त्याला चांगलंच सणकावलं, तसा तोही रागाने म्हणाला,

 ‘वा गं वा, आमच्या मळ्यात एक तर वायर फेन्सिंगवरून आलीस, तेही चोरट्याप्रमाणे परवानगी न घेता व माझीच शरम काढतेस?'

 ‘मी आलेय ते फक्त पाणी घेण्यासाठी; तुझ्या मळ्यातला माल चोरण्यासाठी नाही.' रखमा म्हणाली, 'दरवर्षी तर तहसीलदार तुमची विहीर जनतेला पाणी मिळावे म्हणून ताब्यात घेत होते... पण यंदा तर काय तुम्ही काटेरी तारेचे कुंपण घातलंय, आमची पायवाटही बंद केली.!'

 'ही जमीन आमची आहे व आम्ही यंदा पाण्याची विहीर अधिग्रहित करू नये म्हणून कोर्टातून स्टे घेतला आहे.'

 ‘बरं ते जाऊ दे... मला फक्त पाणी हवंय दोन घागरी.'

 रखमा म्हणाली, ‘मिळेल ना?'

 ‘जरूर! फक्त पाणीच काय मागतेस? दिल मांगो, वो भी देंगे...' दलपत रंगेलपणे म्हणाला.

पाणी! पाणी!! / ११८