पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 सकाळी पाटलीणकाकू पाणी शेंदताना रहाट मोडून पङ्कलं होतं. त्या जागी बायजा अंदाजानं एक एक पाऊल सावकाशपणे टाकीत आली. तिथला काठ बांधलेला नव्हता. तिथं ती उभी राहिली आणि अंदाजानं तो पोहरा विहिरीत हलकेच लोटला.

 होतं... विहिरीत पाणी होतं. तिच्या कानांनी पाण्यावर पोहरा आपटल्याचं टिपलं होतं. तिनं तो दोर हलवला आणि तो थोडा भरताच शेंदण्यासाठी तिची वाकलेली कुडी थोडी अधिक वाकली, हातात जोर येण्यासाठी...

 आणि बायजेचा तोल गेला. भूक व तहानेनं जर्जर झालेल्या तिच्या कुडीला व खारकेसारख्या काटकुळ्या हातांना पोहऱ्यातल्या पाण्याचं वजन पेललं नाही. पायाखालची जमीन निसटल्याचा भास झाला. आणि तिच्या दंतविहीन बोळक्या मुखातून एक घुसमटला स्वर कसाबसा बाहेर आला आणि काही क्षणात तो शांत झाला.

*


 आजही पाण्याच्या टँकरला उशीर झाला होता. कारणंही नेहेमीचीच होती. डिपार्टमेंटचा हा सर्वात जुना ट्रक होता, काही किरकोळ दुरुस्ती निघाली. ती काढून घेण्यात व डिझेल घेण्यात बराच वेळ गेला. मग पांढरवाडीच्या लघुतलावावर जाऊन भरला व गावाकडे निघाला, तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते.

 ड्रायव्हरनं कितीतरी स्वतःशी चडफडाट केला होता; पण राग काढायला आज क्लीनरही सोबत नव्हता. तो ‘सिक' वर होता.

 गावाच्या पाट्यावर भुजबळआण्णा भेटले. ते तालुक्याहून शेवटच्या बसन गावी परतले होते. मग त्यांना गाडीत घेतलं.

 प्रथम त्यांच्या घरासमोर गाडी उभी राहिली. तिन्ही सांजेलाच आक्काबाई लग्न आटोपून आल्या होत्या, त्यामुळे घरी पाणी नव्हतंच. त्यांनी भरपूर पाणी भरुन घेतलं.

 मग सबंध गावाला वळसा घालून ट्रक सामुदायिक विहिरीजवळ गेला आणि पाण्याचा पाईप अंधारातच विहिरीत सोडण्यात आला. काही वेळातच तो टँकर रिता झाला.

 रात्रीतून त्यानं तीन खेपा करून विहिरीत पाणी सोडलं. उद्या त्याचा ऑफ होता. गावातून बोंब होऊ नये म्हणून जादा पाणी सोडणं भाग होतं. तसं त्यानं आजच

पाणी! पाणी!! / १०६