पान:परिचय (Parichay).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६ । परिचय
 

लिहिला-तपासला जाऊ शकतो तो निर्विकारपणा शिवाजीच्या बाबतीत संभवत नाही. महाराष्ट्रात तर हे अधिकच कठीण आहे. अजूनही त्याच्या नावाला 'बाजारभाव ' शिल्लक उरला आहे हे नाकारता येणार नाही.
 शिवाजीचे उपलब्ध जुने चरित्र सभासदाचे आहे. कृष्णाजी अनंत सभासदाने ज्या भक्तिभावनेने शिवाजीकडे पाहिले आहे ती भक्तिभावना आजही बदललेल्या स्वरूपात चालू आहे. कृष्णाजी अनंतापासून आजतागायत सर्व महाराष्ट्रीयांनी शिवाजीकडे मोठ्या श्रद्धेने पाहिले आहे. इतिहास ग्रंथ म्हणून पाहताना या सर्व ग्रंथांच्यावर पसरलेला अनैतिहासिकतेचा थर विसरता येणार नाही. आधुनिक मराठीत शिवाजीविषयी खूपच लिहिले गेले आहे. पण शुद्ध इतिहास म्हणून ज्या ग्रंथाकडे पाहता येईल अशा ग्रंथाची उणीव आजतागायत भासत राहिली. नाव घेण्याजोगी जी शिवाजीची तीन चरित्रे मराठीत उपलब्ध आहेत ती पुष्कळच असमाधानकारक आहेत. कृष्णराव अर्जुन केळस्कर यांचा शिवाजी आणि खुद्द सरदेसायांचा शिवाजी अद्ययावत माहिती लक्षात घेता ठिकठिकाणी आज असमाधानकारक वाटतो. जदुनाथ सरकारांच्या शिवाजीविषयी जरी असे म्हणता आले नाही व ते पुस्तक आजही जरी अभ्यसनीय ठरले असले तरी ते मूळ मराठी पुस्तक नव्हे. पर्शियन सामग्री जदुनाथांनी ज्या प्रभुत्वाने हाताळली, त्या प्रभुत्वाने उपलब्ध समकालीन कागदपत्रे हाताळण्यास त्यांचे पूर्वग्रह आडवे आलेले आहेत. यामुळे शिवाजीच्या चरित्राची इतिहासशुद्ध रूपरेखा आणि शिवाजीचे मूल्यमापन दोन्ही भाग थोडक्यात आटोपणारा सदर ग्रंथ पुष्कळसा त्रोटक, शिवाय अतिरेकी असा वाटतो. तपशीलवार बऱ्याच ठिकाणी त्यात सुधारणा आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यामुळे शिवाजीच्या इतिहासशुद्ध चरित्राची व विस्तृत मूल्यमापनाची मराठीत गरज भासत होती. चरित्राच्या मर्यादेपर्यंत ही उणीव काळे यांच्या पुस्तकाने भरून निघाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
 'सह्याद्री'सारख्या विद्वत्मान्य मासिकाचे चिकित्सक आणि कर्तृत्ववान कर्णधार म्हणून, शिवाय विवेचक इतिहासाचे अभ्यासक म्हणून श्री. दि. वि. काळे यांचे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठाने त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहून घेतले व प्रकाशित केले. श्री. काळे यांच्या कीर्तीत नवे पीस खोवणारा असा हा ग्रंथ झाला आहे. याबद्दल काळे व पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळ ही अभिनंदनास पात्र आहेत. विशेषतः तीनशे पृष्ठे छापील असणारा हा ग्रंथ अवध्या दीड रुपयांत उपलब्ध करून देऊन पुणे विद्यापीठाने महाराष्ट्रीय जनतेची फार मोठी सोय केली आहे. मराठवाडा विद्यापीठाने असल्या प्रकारची कार्ये आरंभिली तर आमच्या विद्यापीठाची प्रतिष्ठा कमी होईल असे मानण्याचे कारण नाही. श्री काळे यांच्या मनावर हिंदुत्वाभिमानाचा