पान:परिचय (Parichay).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. छत्रपती शिवाजी महाराज



छत्रपती शिवाजी महाराज यांचा काल होऊन आज जवळपास पावणेतीनशे वर्षे होत आली आहेत आणि त्यांच्या जन्माला तीनशे वर्षांहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. पण अजूनही शिवाजी खऱ्या अर्थाने इतिहासाचा भाग झालेला नाही. ऐतिहासिक व्यक्तींच्याविषयी ज्या निर्विकार- पणे चर्चा व्हावयाला पाहिजे ती निर्विकारता आजही महाराष्ट्रीय मनाला शक्य नाही. आणि कदाचित अजून काही शतके शिवाजीचा निर्विकारपणे विचार करणे शक्य होणार नाही. १८६८ इतक्या जुन्या काळी छत्रपतींच्या अभिमानाने पेटलेला कीर्तन्यांच्यासारखा माणूस ग्रॅंट डफवर तुटून पडतो. ज्या काळात इंग्रजी राज्य 'दैवी वरदान' मानले जात असे त्या काळीसुद्धा महाराष्ट्र शिवाजी- विषयी कमीजास्त ऐकून घेण्यास तयार

नव्हता. ज्या काळी इंग्रजांच्या राज्या-विरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ पेट घेऊ लागली त्या काळी टिळकांनासुद्धा लोकजागृतीसाठी शिवाजीउत्सव सुरू करण्याचे महत्त्व पटले. स्वातंत्र्योत्तरकाळात संयुक्त महाराष्ट्र लढा लढणाऱ्या मंडळींना आणि असा लढा देण्याची गरज नाही असे म्हणणाऱ्यांना शिवाजीचे नाव वापरण्याची गरज भासली. असे एकूण शिवाजीचे व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रीय पंडितांनी गेल्या चार पिढ्यांत जे इतिहास संशोधन केले त्याचा फार मोठा व्याप शिवाजीशी निगडित आहे. आमच्या मनात असणाऱ्या स्वातंत्र्य प्रवृत्तीचे, महाराष्ट्राच्या अस्मितेचे शिवाजी कायमचे प्रतीक होऊन गेला त्यामुळे चालुक्यांचा अगर वाकाटकांचा किंबहुना यादवांचा आणि कृष्णदेवरायाचाही इतिहास ज्या निर्विकारपणे