पान:परिचय (Parichay).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोधमुद्रा । ९३

दृष्टीने महत्त्वाचे आहे. असाच एक शब्द वेठबिगार आहे. मराठीत असे जोडशब्द सापडतात. रोजगार म्हणजे वेतन, बेगार म्हणजे वेतन न देता घ्यावयाचे काम हाच वेठ शब्दाचा अर्थ आहे. पण जून्या काळी वेठ, वेठी आणि त्या पूर्वीच्या काळी विष्ठी हे शब्द सापडतात. त्यामुळे ही कल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हा एक प्रकारचा कर दिसतो.
 ब्रह्मानंद देशपांडे यांचे स्वतःचेच अध्ययन अतिशय चौरस आहे.ते एका शिलालेखाचा इतर अनेक लेखांशी, ज्ञात इतिहासाशी संबंध स्पष्ट करतात. असे संबंध स्पष्ट करताना पाहता पाहता निरनिराळ्या ऐतिहासिक समजुती बदलून टाकतात. आजतागायतची समजूत अशी की, घारापुरी येथील लेणी कलचुरीची आहेत, ब्रह्मानंदांनी ती चालुक्यांची ठरविली आहेत. मराठवाड्यातील परमार राजवंशाच्या संचाराकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. शिलालेखांचा, समकालीन जैन, संस्कृत आणि महानुभाव वाङमयाशी सांधा ते स्पष्ट करतात. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासावर अतिशय मार्मिकपणे नवा प्रकाश टाकतात तेव्हा त्यांचा व्यासंग आणि चौरसपणा इतका स्पष्ट आहे की, त्यावर पुन्हा विवेचन करण्याची गरज नाही. गरज आहे महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी त्यांच्यामागे आर्थिक साहाय्य उभे करून अधिक व्यापक प्रमाणावर संशोधन करून घेण्याची.
 आत्ता इतके सगळे सांगितल्याच्या नंतर काही ठिकाणी मतभेद दाखविणे भाग आहे. या मतभेदप्रदर्शनाचे कारण आपणही त्या विषयातील जाणकार आहो हे नसते. मतभेदाचे कारण हे आहे की, असे मतभेद दाखविणे ही विद्वानांची प्रथा आहे. केवळ प्रथा म्हणून तिचे पालन करणे मला भाग आहे. भोजाला भारतीय परंपरा दुसरा विक्रमादित्य मानते ही गोष्ट पुष्कळशी घोटाळा निर्माण करणारी आहे. राजा भोज आणि कालिदास यांच्या कथा, विक्रमादित्य आणि कालिदास यांच्या कथा यांतील ही सरमिसळ आहे. पण याहीखेरीज अनेक विक्रमादित्य आमच्या परंपरेत आहेत. त्यामुळे शनिमाहात्म्यातील विक्रमादित्य नेमका कोणता हे सांगता येणे कठीण आहे. शनिमाहात्म्य हा ग्रंथ अगदी अलीकडचा चौदाव्यापंधराव्या शतकातील. शनीच्या कथेत राजा विक्रमादित्य आहे की नाही हेच अजून नक्की सांगता येत नाही, म्हणून शनिमाहात्म्यातला विक्रमादित्य परमार भोज असावा काय ? आणि चालुक्य तैल्याने राजा मुंज याचा वध केला या घटनेचे रूप तेल्याने विक्रमाचे हात-पाय तोडले असे झाले असावे काय ? ही चर्चा मला अधांतरी वाटते. शिलालेखासारख्या दृढ पुराव्याच्या विवेचनात, लोकसाहित्याच्या अभ्यासात शोभणारी अनुमाने परवडतील, असे मला वाटत नाही. अर्थात ज्ञानाची क्षेत्रे मी भिन्न मानीत नाही. देशपांडे यांचे अनुमान कदाचित खरेही ठरेल, पण त्यासाठी याहून अधिक बलवत्तर प्रमाणाची गरज आहे.