पान:परिचय (Parichay).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२ । परिचय
 

सिल्लोड येथे वामेश्वर मंदिराचा लीळाचरित्रातील उल्लेखही असाच अतिशय महत्त्वाचा आहे. प्रा. देशपांडे यांचा शिलालेखांचा अभ्यास आद्य महानुभाव ग्रंथातील माहितीची यथार्थता व विश्वसनीयता वृद्धिंगत करणारा आहे. केवळ एक सत्य म्हणून याची आपण नोंद घेतली पाहिजे.
 या संग्रहातील सेउणदेशकर सिंघणदेव प्रथम, याच्या शिलालेखाची उपलब्धी ही एक महत्त्वाची घटना आहे. सेउणदेश हा नेमका कोणता भाग आहे यावर संशोधकांत वाद आहे. रित्तीसारखे काही संशोधक यादवांचे कुलनाम सेउण असल्यामळे ते संपूर्ण घराणेच कानडी आहे असे मानतात. यादवांचे घराणे हे एक महाराष्ट्रीय घराणे आहे. या शिलालेखाच्या मधुन येणारी नामदेवासारखी व्यक्तिनामेही महत्त्वाची आहेत. कारण साधुसंतांची आपल्याला ज्ञात असणारी नावे त्यांच्याही पूर्वी व्यक्तिनामे म्हणून रूढ कशी होती या मुद्द्याला महत्त्व आहे. नामदेव हे नाव नामभक्तीचा प्रचार झाल्याच्या नंतरच येते हे विसरता येणार नाही. धर्मपुरी शिलालेखात 'तैलंगी' हा शब्द आहे. त्याचा तेली हा अर्थ मला विवाद्य वाटतो. 'कारण तैलकेणी यात तेली हा शब्द येऊन जातो' त्याच ओळीत किरकोला हा शब्द आहे. 'तो मला महत्त्वाचा वाटतो.' कारण हा शब्द मराठीत आलेला असण्याचा संभव आहे. सेठी चांगदेव यावर या लेखांनी पडणारा प्रकाश असाच महत्त्वाचा आहे, वापीकार हा शब्द बिडकीन येथील शिलालेखात ओविकार जसा आलेला आहे. यामुळे ओम हे अक्षर वा लिहिण्यासाठी वापरले जात होते असा ग्रह होतो. ॐ या अक्षराचे उच्चार ओम ओं, वों, ओ असे व्यक्तिपरत्वे होतात. हा उच्चार काही जणांच्या बाबतीत वा असा जर होत असेल तर ते संभवनीय आहे. मात्र अजून काही लेखांतून याला उपोद्बलक पुरावा मिळायला पाहिजे. माणकेश्वर हे शंकराचे त्या वेळचे लोकप्रिय नाव दिसते. माणकेश्वर गावी माणकेश्वर सापडावा यात नवल नाही, पण कैलास लेण्याचे जुने नावही माणकेश्वर लेणे आहे. मणी हा बौद्ध वाङ्मयात लिंगवाचक शब्द आहे, त्यामुळे माणकेश्वर हे शंकराचे नाव महाराष्ट्रातील वज्रयान बौद्धांच्या प्रभावाचा अवशेष असण्याचा संभव आहे. थोरातसारखी आडनावे, मढूसारखे मठवाचक शब्द हेही विचारांना पुष्कळ खाद्य देतात.
 असाच एक शब्द 'रायनारायण' हा आहे. हे कल्याणी चालुक्याचे बिरुद आहे. या शब्दाचा रावोनारायणु या शब्दाशी काय संबंध आहे याचा शोध घेतला पाहिजे. एकच शब्द झंपडाचार्य झंपणाचार्य, झंपळाचार्य, झेपडाचार्य, अशी रूपे धारण करतो. या शब्दात जगथाप या आडनावाचे मूळ आहे ही माहिती महत्त्वाची आहे. असे संशोधनाला खाद्य देणारे किती तरी प्रश्न या शिलालेखांच्यामुळे निर्माण होतात. आजचा पाटील हा शब्द यादव काळातील पाटेल आहे आणि तो सातवाहन काळातील पट्टकील आहे. या वतनाचा शब्द म्हणून शोध घेणे सामाजिक इतिहासाच्या