पान:परिचय (Parichay).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोधमुद्रा । ९१

की नाही हा वादविषय नव्हे. वादाचा विषय आहे इराउतु हे स्त्रीलिंगी नाम यादवकाळात संभवते काय? त्याबाबत मात्र मलाही असे वाटते की, एरावताचे ऐराउतु हे रूप यादवकाळात संभवत नाही. यादवकालात महाराष्ट्रात इरावती असे नाव होते की नाही, ते मराठी वाटते की नाही, याची चर्चा अधिकारी पुरुषांनी जरूर करावी. माझे मत असे की, इरावती नाव मला महाराष्ट्रीय वाटते. यादवकालात ते मला महाराष्ट्रात संभवनीय वाटते, पण त्याचे रूप इराउतु होत नाही. या शिलालेखापुरता विचार करावयाचा तर दोन बाबी स्पष्ट वाटतात.
 'तेयाचा' हा शब्द निश्चितपणे त्यापुढे ज्या भिवू थोराताचे नाव आहे तो थोरात नावाचा माणूस त्याआधी उल्लेखिलेल्या देशाधिपतीचे अधिनत्व सांगतो म्हणून भिव थोरात देशाधिपती नव्हे. दुसरे म्हणजे इराउत हे वाचन संभवत नाही. म्हणून या शिलालेखात राणीचे नाव नाही. तसे राणीचे नाव असण्याचे कारणही नाही. माझे मत अशा प्रकारचे असल्यामुळे माझा कल देशपांडे यांचे वाचन स्वीकारार्ह मानण्याकडे आहे. अर्थात हा अनाधिकाऱ्याचा कल आहे. ठोसर आणि ब्रह्मानंद देशपांडे या दोन अधिकारी पुरुषांना परस्परांशी वाद घालण्याची अजून पन्नास वर्षे संधी मिळो अशी शुभेच्छा आहे !

 देशपांडे यांच्या या शोधनिबंधामुळे महानुभाव वाङ्मयातील काही शब्दांच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. महानुभावांच्या वाङमयाचा विविध बाजूंनी कसून आणि चिकित्सक अभ्यास व्हायला पाहिजे, असे माझे नेहमीचेच मत राहिलेले आहे. आज आमच्या समोर लीळाचरित्र ज्या स्वरूपात उपलब्ध आहे ते जसेच्या तसे तेराव्या शतकातील महिमभटाच्या हातचे लिखाण आहे, यावर माझा विश्वास नाही. पण क्षेपप्रक्षेपांची चर्चा होण्यापूर्वी काळजीपूर्वक अभ्यास होणे आवश्यक आहे विशेषतः यादवकालीन शिलालेख आता पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत. ह्या मराठी शिलालेखांची शंभर वर्षे मागचे पुढचे संस्कृत शिलालेख, संस्कृत व प्राकृतातील जैन वाङ्मय यांच्याशी तुलना करून शब्दाची निश्चिती करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यादवकालीन शिलालेखातील किती शब्द व रूपे महानुभाव वाङमयात सापडतात याची तपशिलाने नोंद केली पाहिजे आणि हाच अभ्यास वारकऱ्यांच्या वाङमयाच्या बाबतीत घडला पाहिजे. याशिवाय त्या काळातील प्राचीनत्वाचा शोध फक्त व्याकरणाच्या आधारे घेणे अपुरे ठरेल असे मला वाटते. ब्रह्मानंद देशपांडे यांनी या दृष्टीने काही महत्त्वाच्या शब्दांचा उल्लेख केला आहे. असा एक शब्द गोविंदप्रभुचरित्रातील 'रणराखसा' हा आहे. हा शब्द ठाणेगाव येथील शिलालेखात एका माणसाची पदवी म्हणून 'रणराषक्र' असा आलेला आहे. दोन्ही रूपे रणराक्षस या शब्दांची आहेत. मला स्वतःला मूळ गोविंदप्रभुचरित्रात रणराक्षस असा शब्द असावा असे वाटते. असाच अजून एक शब्द 'पंचनगरे' हा दिसतो.