पान:परिचय (Parichay).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९० । परिचय
 

पण शेवटी तो जुनाच प्रश्न अजून शिल्लक आहे- हा खर्च सोसणार कोण ? विद्यापीठे व महाविद्यालये, याबाबतीत आपली काही जबाबदारी आहे असे मनापासून मानत नाहीत. एरवी राजवाडचांचे उत्तर याही संशोधकांनी दिले असतेच.
 या ग्रंथामुळे चनई शिलालेख, रांजणा शिलालेख, सिल्लोड शिलालेख असे अनेक शिलालेख प्रथमच प्रकाशित होत आहेत. या शिलालेखांत छोटे छोटे असे यादवकालीन आठ मराठी शिलालेख दोन वेगवेगळ्या लेखांत आहेत. ही साधने केवळ अप्रकाशित आहेत. इतकेच त्यांचे महत्त्व नाही; त्यांतून काही महत्त्वपूर्ण सत्यकण बाहेर येत आहेत, ते राजकीय इतिहासाशी निगडित आहेत, तसे मराठी भाषेच्या लिपी, लेखन आणि शब्दरचना यांवर नवीन प्रकाश टाकणारेही आहेत. धर्मापुरी शिलालेख तर तत्कालीन सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा शिलालेख आहे. म्हणून ही साधने अतिशय महत्त्वाची आहेत. याचे भान आपण ठेवले पाहिजे. ठिकठिकाणी देशपांडे लेख कोरणाऱ्याचा निष्काळजीपणा दाखवीत असतात. लेख त्रुटित स्वरूपात उपलब्ध होणे, त्यावरील अक्षरे पुसट होणे आणि कोरक्यांचे निष्काळजीपणे कोरणे या अशा बाबी आहेत की ज्यामुळे नानाविध प्रकारचे वाद निर्माण होतात. सर्वच ठिकाणी प्रा. देशपांडे यांनी कोरक्यांचा निष्काळजीपणा सांगितला आहे, जो सर्वमान्य होण्याचा संभव कमी आहे. आणि प्रत्येक शब्दाच्या बाबतीत निष्काळजीपणा हे स्पष्टीकरण पटणे कठीण आहे. असे ठिकाण आले म्हणजे मतभेद निर्माण होतात. दोन अधिकारी माणसे मतभेद दाखवू लागली म्हणजे त्यांतून अनेक कूटे उकलली जातात. या ग्रंथात मानुर शिलालेखावर असा एक वाद संग्रहित आहे.
 आमचे मित्र हरिहर ठोसर आणि ब्रह्मानंद देशपांडे यांनी शिलालेखावर वाद घालावा, परस्परांच्या वाचनावर टीका करावी ही गोष्ट मी आनंदाची मानतो. ज्ञानाच्या क्षेत्रात मित्रांनी मित्रांवर टीका करायचीच नाही अशी गटबाजी नसावी. मी स्वतः या क्षेत्रातील अधिकारी नव्हे, पण मला स्वतःला वेगळ्या काही गोष्टी जाणवतात. त्यांतील एक बाब म्हणजे इराई ही ग्रामदेवता महाराष्ट्रात आहे याची नोंद घेतली पाहिजे. काही ठिकाणी म्हसोबा, खंडोबा ह्या देवता विरोबा असल्यामुळे म्हाळसा ही इराई झाली आहे, ते विराई या शब्दाचे रूप आहे. काही ठिकाणी हमखास पावणारी देवी ही इराई झाली आहे. ते वराई शब्दाचे रूप आहे. काही ठिकाणी एकवीरा म्हणजे रेणुका हीच इराई झाली आहे. ते एकवीरा आई या शब्दाचे रूप आहे. म्हणजे इराई ही देवता महाराष्ट्रातील ग्रामदेवतांत आहे. आता प्रा. देशपांडे जर मला यादीत नाव दाखवा म्हणणार असतील तर माझा नाइलाज आहे. कारण महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामदेवतांची नावे व पर्यायी नावे असणारी बृहन्नामावली माझ्या पाहण्यात नाही. मात्र इराई हे नाव यादव काळात संभवते