पान:परिचय (Parichay).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोधमुद्रा । ८९

साधन आहे. डॉ. रित्ती यांचा संशोधनक्षेत्रातील अधिकार सर्वमान्य आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट तितकीच उघड आहे की, रित्ती यांना या भागातील गावे आणि भूगोल यांची माहिती फारशी नव्हती. शिलालेखांचा संशोधक हा त्या त्या प्रदेशाचा, संस्कृतीचा आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा जाणकार असावा लागतो. केवळ अक्षरवाटिका आणि ठसे वाचून या क्षेत्रात निर्वाह चालणार नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की, ब्रह्मानंद देशपांडे हे ज्या साधनांचे संपादन करीत आहेत त्यांचे जाणकार आहेत. आणि ते पुरेसे नम्र आहेत,
 संशोधनाच्या क्षेत्रात ही नम्रता मी अतीव महत्त्वाची मानतो. ज्यांनी शिलालेखाकडे प्रथम लक्ष वेधले, ज्यांनी प्रथमतः एखाद्या साधनाचे वाचन केले त्या पूर्वगामी अभ्यासकांचे व साहाय्यकांचे ऋण मान्य करणे अगत्याचे असते. त्यामुळे अधूनमधून आपल्या चूका लक्षात येतात; त्या सुधारून घेतल्या पाहिजेत. धर्मापुरी शिलालेखाच्या बाबतीत देशपांडे यांनी हे स्पष्ट नोंदवलेले आहे की, डॉ. कोलते यांनी मूळ शिला पाहिलेली नाही, पण त्यांनी जे वाचन केलेले आहे त्यामुळे आता आम्हाला आमच्या वाचनातील चुका आणि त्रुटी सुधारून घेता आल्या आहेत. ज्ञानाच्या क्षेत्रात हा प्रांजळपणा महत्त्वाचा असतो. ऋण सर्वांचे मान्य करावे, कोणत्या ठिकाणी आपल्याला उलगडा होत नाही त्याची स्पष्ट नोंद करावी लागते. अनुमानांना पुरावा आणि संभाव्यतेला निश्चिती भासविण्याची चातुर्यकला प्रयत्नपूर्वक विसरावी लागते. मतभेद असतातच. ज्ञानाच्या क्षेत्रात ते असावेत. मतभेद दाखविताना प्रतिस्पर्ध्याच्या मोठेपणापुढे दबून जाण्याची गरज नसते हे जितके खरे, तितकेच मतभेद अतिशय स्पष्टपणे पण सभ्यतेचे संकेत पाळून, व्यक्तिगत संदर्भ टाळून, दाखवता येतात याचे भानही असावे लागते. ब्रह्मानंद देशपांडे यांच्याजवळ प्रायः ही सर्व गुणसंपदा आहे. यामुळे मला त्यांच्या लिखाणाविषयी अधिक आस्था वाटते.
 राजवाड्यांचे ऐतिहासिक लेखसंग्रह व कागदपत्रांचे संग्रह प्रकाशित होऊ लागले तेव्हा त्यावर एक टीकाही होती की, हे शास्त्रशुद्ध संपादन नाही. प्रत्येक कागदपत्राचा ठसा हवा, शिवाय टीपा विस्तृत हव्यात. राजवाड्यांनी उत्तर देताना ही गरज मान्य केली आहे व असे म्हटले आहे की, अशा प्रकारच्या प्रकाशनाचा खर्च कुणी सोसणार असेल तर आपण विनामूल्य सेवेला तयार आहोत. एरवी आमच्या शक्तीत ह्या विदुराच्या कण्या आहेत, त्या गोड मानून घेणे भाग आहे. 'शोधमुद्रा' ग्रंथ पाहताना माझ्या मनात असा विचार आला की, प्रत्येक शिलालेखासोबत एक स्थळाचे छायाचित्र आणि एक मूळ ठशाचे छायाचित्र असते तर बरे झाले असते. शिलालेख, ताम्रपट, नाणी यांच्या अभ्यासात मूळ ठशांना फार महत्त्व प...६