पान:परिचय (Parichay).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८ । परिचय
 

होते. नाणी आणि शिलालेख यांचा अभ्यासही या मंडळींना कठीण होता. या सामान्य नियमाला अपवाद फक्त सेतुमाधवराव पगडींचा होता. त्यांचे इतिहासाचे पद्धतशीर अध्ययन झाले होते. त्यांनी फार्सीचा व्यासंगही प्रचंड प्रमाणात वाढविला. पण हे उदाहरण अपवाद समजायचे. संशोधकांच्या या पिढीने केलेल्या कार्याचे महत्त्व कमी लेखण्याचे कारणच नाही. उलट आज सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे जो इतिहास- संशोधनाचा अभ्यास चालू आहे त्या मानाने या जुन्या मंडळींनी प्रतिकूल परिस्थितीत जे कार्य केले त्याचे मोल मी फार मोठे मानतो. पण परिस्थितीची मर्यादा ही की, मराठवाड्यात प्राचीन भारताचा पद्धतशीर संशोधनात्मक अभ्यास त्या वेळी होऊ शकला नाही.
 पोलिस ॲक्शन नंतर नवीन कालखंड सुरू होण्यास बराच अवधी लागतो. महाविद्यालयांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढल्यानंतर या दिशेने प्रगती होणे शक्य असते. क्रमाने संशोधकांची एक नवी पिढी मराठवाडयातून उदयाला येत आहे. ब्रह्मानंद देशपांडे, गोरक्ष देगलूरकर, हरिहर ठोसर, प्रभाकर देव, इत्यादी मंडळी या नव्या पिढीतील ठळक उदाहरणे होत. हे सगळेच प्राध्यापक आहेत. इतिहासाचे पद्धतशीर शिक्षण घेतलेले. त्यामुळे संशोधनविषयाची व्यापक पार्श्वभूमी ज्ञात असलेले, संशोधनाच्या पद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेले, हे अभ्यासक आहेत. यामुळे कागदपत्रांचे संशोधन, हस्तलिखितांचे संशोधन चालू असतानाच शिलालेख, ताम्रपट, नाणी, मराठवाड्यातील वास्तुशिल्प, चित्रकला, मूर्तिकला यांच्या अभ्यासाला आरंभ होत आहे. ज्या मंडळींच्या परिश्रमातून आणि व्यासंगातून ही नवी आघाडी साकार होते आहे त्यांत एक महत्त्वाचे संशोधक म्हणून ब्रह्मानंद देशपांडे आहेत. वातावरण असे बदलले म्हणजे जुन्या पिढीच्या संशोधकांनाही शिलालेख ताम्रपटात रस घ्यावासा वाटू लागतो. हे सुचिन्हच म्हणायला पाहिजे.
 हा संग्रह पाहताना मला पुन्हा एकदा तीव्रपणे इतिहासाचार्य राजवाडे यांची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी यशवंत महाविद्यालय या संस्थेने नांदेड जिल्ह्यातील शिलालेखांचे संपादन करून एक प्रकाशन काढले होते. एक तर हे प्रकाशन इंग्रजीतून केले होते. दुसरे म्हणजे या प्रकाशनासाठी विख्यात संशोधक डॉ. रित्ती ह्यांचे साह्य घ्यावे लागले होते. ते पुस्तक पाहताना मला अशीच राजवाडे यांची आठवण झाली होती. आजही मूळ साधने इंग्रजीतून प्रकाशित करणे हीच गोष्ट सर्वांच्यासाठी सोयीची राहिली आहे. हे पाहिल्यावर राजवाड्यांची आठवण येणारच. अजून महत्त्वाची साधने निश्चितपणे मराठीतून संपादित करण्याची वेळ यायची आहे. हा अभिमानाचा भाग नसून सोयीचा भाग आहे. कारण इतर प्रांतीय संशोधकाचे लक्ष साधनांच्याकडे वळवायचे असल्यास इंग्रजी हेच आजही हुकमी