पान:परिचय (Parichay).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोधमुद्रा । ८७

आहेत. दोन लेख शिलालेखांच्या वाचनाची चर्चा करणारे आहेत. एक लेख शिलालेख, ताम्रपटांतील बिरुदांची चर्चा करणारा आहे. जे राहिलेले दोन विवेचनात्मक लेख आहेत त्यांचाही सबंध शिलालेखांशीच आहे. काही शिलालेख या पुस्तकात प्रथमच प्रकाशित होत आहेत. म्हणजे ते प्रा. देशपांडे यांनीच प्रथम उजेडात आणलेले आहेत. काही शिलालेख इतरांनी यापूर्वी संपादित केलेले असले तरी ब्रह्मानंद देशपांडे यांचे वाचन तरी निराळे आहे, अगर अर्थनिर्णय तरी निराळा आहे. मराठवाड्यातून अशा प्रकारचे शिलालेखांच्या विवेचनाला वाहिलेले असे है पहिलेच प्रकाशन आहे आणि म्हणून त्याचा पुरस्कार करणे एक प्रकारे माझे कर्तव्य होते.
 मराठवाडा हा जुन्या हैदराबाद संस्थानचा भाग. जुन्या हैदराबाद संस्थानात शिक्षणाची आबाळ सार्वत्रिक होती. पदवी परीक्षेचे शिक्षण फक्त हैदराबाद शहरातच आणि तेही उर्दू माध्यमातून असे. राजवट, मध्ययुगीन इतिहासात काही प्रमाणात रस घेणारी असली तरी प्राचीन इतिहास हा हिंदूंचा इतिहास होता. त्यात या राजवटीला फारसा रस नव्हता. या घटनेचा हैदराबाद संस्थानातील इतिहाससंशोधनावर अपरिहार्य असा परिणाम घडलेला आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्यामुळे एका बाजूने संशोधनाची सुविधा आणि दुसऱ्या बाजूने संशोधनाची गरज निर्माण होत असते. हे वातावरणच हैदराबाद संस्थानात नव्हते. म्हणून संस्थानाबाहेरच्या ज्या अभ्यासकांना गरज वाटेल त्यांनी स्वयंप्रेरणेने यावे व संशोधन करावे यापेक्षा जुन्या हैदराबाद संस्थानात अधिक काही घडण्याचा संभव नव्हता.
 या वातावरणात मराठवाड्यातील संशोधकांची पहिली पिढी निर्माण झालेली आहे. चि. नी. जोशी, र. मु. जोशी, र. म. भुसारी, न. शे. पोहनेरकर, वि. अं. कानोले, भी. ल. परतुडकर ही या पिढीतील संशोधकांची काही नावे आहेत. अर्थातच ही यादी परिपूर्ण नाही. या ठिकाणी या संशोधकांचे संशोधन सांगून त्या संशोधनाचा आढावा घेणे हा माझा हेतू नाही. मला या बाबीकडे लक्ष वेधायचे आहे की, संशोधकांच्या या पिढीत काही वैशिष्टये दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे या संशोधकांचे मुख्य लक्ष वाङमयेतिहासाकडे आहे. कारण उपलब्ध होणारी अप्रकाशित काव्यग्रंथांची संख्या विपुल होती आणि ते वाचून तिच्यावर परिचयपर लेख लिहिणे या मंडळींच्या आटोक्यातले होते. इतिहासशास्त्राचे पद्धतशीर असे अध्ययन या मंडळींचे नव्हतेच. हौसेने हे अभ्यासक, इतिहास अभ्यासक, इतिहाससंशोधनाकडे वळले आणि हौस म्हणूनच या क्षेत्रात राहिले. प्राचीन साहित्यग्रंथ वाचताना अधुनमधुन मोडीच्या आधारे सनदा व कागदपत्रे वाचण्याचा त्यांनी सराव ठेवला. पण फार्सी सनदा पत्रांचे व साधनांचे संशोधन यांना कठीण