पान:परिचय (Parichay).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४ । परिचय
 

यज्ञाखेरीज इतर मार्गांचा विचार करण्याची गरज नाही, ही पूर्वमीमांसकांची भूमिका म्हणजे प्रवृत्तिमार्ग. कर्मातून मोक्ष हे प्रवृत्तिमार्गीयांचे प्रमुख सूत्र. लोकयात्रेसाठी कर्माचे महत्त्व मान्य, पण कर्मातून मोक्ष मिळत नाही, तो ज्ञानाने मिळतो ही उत्तर मीमांसकांची ऊर्फ वेदांताची भूमिका म्हणजे निवृत्तिमार्ग. सर्व भक्तिमार्ग, मग तो वल्लभ-मध्वांचा असो की वारकऱ्यांचा असो वा अजून कोणत्या संप्रदायाचा असो, सारेजण उत्तरमीमांसकांचा भाग आहेत. त्यांना प्रवृत्तिमार्गी होता येणे शक्य नाही. या अर्थाने सारे वारकरी ज्ञानोबा ते तुकोबा आणि पुढे विनोबा हे सगळे निवृत्तिमार्गीच आहेत. प्रवृत्तिनिवृत्तीचा हा एक अर्थ आहे.
 गावात राहणे, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे आणि सगळे कर्तव्यकर्म ईश्वरार्पण बुद्धीने करून परलोककल्याण करून घेणे इतकाच प्रवृत्तिमार्गाचा अर्थ असेल तर मग सारा वारकरी संप्रदायच प्रवृत्तिमार्गी म्हणायला हवा. विठ्ठलभक्तीची गोडी सांगण्यासाठी वारंवार जन्म घेऊन भक्तीची गोडी चाखू ही भूमिका अर्थवाद समजायची. ती परमार्थाने घ्यायची नाही. जन्ममत्यूच्या चक्रातून सुटका होणारच नसेल तर मग भक्तिमार्गाला काहीच अर्थ उरत नाही. आणि भक्तिपूर्वक ईश्वरीकृपाही कुणी मागणार नाही. वारकरी संप्रदाय हा आरंभापासून जनतेचा संप्रदाय आहे. काळीवर शेत आणि पांढरीवर घर नसणारा जातिबहिष्कृत ज्ञानेश्वर हा वैचारिक नेता आणि नामदेव हा प्रचारक संघटक असे त्याचे स्वरूप आहे. अलुतेदार बलुतेदार असणाऱ्या अठरापगड जातींचा हा संप्रदाय. त्याच्या पोटात वरिष्ठ आणि सर्वसामान्यजन असे दोन्ही प्रवाह कधी एकत्र, कधी समांतर तर कधी विरोधी, असे वाहत आले आहेत. ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांचा निर्वश केला आणि त्याला आपला सर्व श्रेष्ठ संतही मानला. श्रुतीस्मृतींचे मोठेपण सांगणारा पण कर्मकांड न मानणारा जनतेचा संप्रदाय या भूमिकेवरून वारकरी संप्रदायाकडे पाहायचे असेल तर नामदेवाचा विचार गंभीरपणे केला पाहिजे. नुसता ज्ञानेश्वर पुरेसा नाही.
 एकनाथ म्हणजे वारकरी संप्रदायाचा दुसरा टप्पा. सामाजिक सुधारणावाद आणि राजकीय जाणीव असे दुहेरी व्यक्तिमत्त्व असणारा पुरुष म्हणजे एकनाथ. तर तुकाराम हा लोककवी आणि महाकवी. पण सामाजिक प्रवाहात एकनाथ म्हणजे तुकाराम व रामदास. एकनाथाची भूमिका वारकरी संप्रदायात फारशी रुजली नाही याची कारणेही पाहावी लागतील. अंतरंग भक्तीला संपूर्ण मोठेपण देऊन बहिरंग गौण करणारा प्रवाह आणि हे सगळे तोंडाने बोलणारा पण व्यवहारात परंपरेला घट्ट धरणारा प्रवाह हे दोन्हीही वारकरी संप्रदायात वावरतच होते. हे सारे धागे काळजीपूर्वक पाहून वारकऱ्यांचे ऐतिहासिक कार्य तपशिलाने अभ्यासावे लागणार आहे. दिशा देहूकरांचीच पण तिचा व्याप वाढायला हवा असे माझे म्हणणे आहे.
 देहूकरांनी शिवाजीवर लिहिले आहे. ग्रामीण साहित्यावरही लिहिले आहे. जे