पान:परिचय (Parichay).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंथन । ८३

आहे असे कुणीतरी म्हणणारच. प्रमाणप्रत ही कधी सर्व सांप्रदायिकांचे एकमत होईल अशी प्रमाणप्रत करता येत नसते. फक्त प्रमाण अशी पाठचिकित्सापद्धती वापरणारी प्रत सिद्ध करता येते. शासनाने गोंधळ केलेला आहेच. पण संपादक मंडळालाही आपले ज्ञान दाखवावे लागते. त्याविना कीर्ती व बिदागी ठरत नाही. शासनाने गोंधळ करावयाचा नाही असे ठरविले असते तरी सर्व परंपरावाद्यांना प्रमाण वाटेल अशी प्रत सिद्ध करता येणे अशक्य होते. परंपरावादाची खरी अडचण हीच आहे. 'परंपरा' ही एक श्रद्धा असते. तीत थोडे थोडे पूरक, ही वास्तवता असते. आणि मीच तेवढा प्रमाण, हा अभिमान तिथे अधिक असतो. चर्चा आणि चिकित्सा, तुलना आणि अभ्यास ह्यांसह जे ठरते ते शास्त्रानुसारी ठरो, की बहुमताने ठरो, सर्वांना कधी प्रमाण नसतेच.
 संत तुकारामांना आयुष्याच्या उत्तरार्धात खुप प्रतिष्ठा आणि मान्यता होती. त्यांचा शिष्यपरिवारही खूप मोठा होता. तुकोबांची कीर्तनेही प्रसिद्ध होती असे मानणे भागच आहे. ते काही एकांतनिवासी मठाधिपती नव्हते. तेव्हा तुकाराम टाळकरी नव्हते व टाळकरी ही कल्पना उत्तरकालीन आहे हा मुद्दा पटणार नाही. बेंद्रे यांच्या विवेचनातील त्रुटी देहूकरांनी चांगल्या दाखविलेल्या आहेत. संताजी जगनाडे यांचे स्थान या टाळकऱ्यांत अत्यंत महत्त्वाचे आणि मध्यवर्ती आहे.
 प्रस्तावना मनात ठरविली होती त्यापेक्षा अधिक लांबत जात आहे असा तोल सुटणे बरे नव्हे याची मला जाणीव आहे. इतर अनेक मुद्दे महत्त्वाचे व चिंतनीय आहेत याची नोंद करून फक्त अजून दोन बाबींना मी धावता स्पर्श करणार आहे..


 वारकरी संप्रदायाचे स्वरूप स्पष्ट करताना आपण काही बाबींकडे दुर्लक्ष करतो. त्यांना विवेचनात गौण स्थान देतो हे न्याय्य आहे असे मला वाटत नाही. आपण प्रथम ज्ञानेश्वर आणि नंतर तुकाराम यांचा तपशिलाने विचार करतो. नामदेव आणि एकनाथ यांना आदरपूर्वक नमन आपण करतो पण त्यांचा विचार ओघाओघाने जमेल तेवढा करतो. दुसरे म्हणजे वारकरी संप्रदायातील परस्परविरोधी प्रेरणांचा आपण फारसा विचार करीत नाही. या प्रश्नाशी निगडितच दूसरी बाब आहे ती म्हणजे आपण प्रवृत्तीनिवृत्ती यांचा विचार गोंधळासह करतो. हा गोंधळ भक्तिमार्गातील भिन्नभिन्न प्रेरणांच्या पृथक नादामुळे निर्माण होतो. देहूकरांनी दोन लेखांत या प्रश्नांना स्पर्श केलेला आहे.
 क्रमाने विचार करायचा तर प्रवृत्तिमार्ग म्हणजे काय, असा प्रश्न आपण विचारला पाहिजे. कर्मातूनच मोक्ष मिळतो, कर्म म्हणजे वर्णविहित वैदिक कर्म, यज्ञ हा इहलोकी इष्ट व फलदायक आणि. शिवाय परलोकी मोक्षदायक. म्हणून