पान:परिचय (Parichay).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंथन । ८१

एक छोटेखानी काव्य आहे. काव्यकर्ता स्वतःला ज्ञानदेव म्हणवून घेतो. या ग्रंथाच्या जुन्या प्रती पाहता हा ग्रंथ एकनाथाच्या काळी अस्तित्वात होता असेही आढळून येते. इतक्या बाबी निर्विवाद आहेत. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाचा कर्ता निवृत्तीशिष्य ज्ञानदेव हाच उत्तरगीतेचा कर्ता आहे काय, हा फक्त वादाचा विषय आहे. सदर ग्रंथ मराठवाडा साहित्यपरिषदेने छापलेला असून संपादक डॉ. श्रीधर कुलकर्णी आहेत. त्यांचे मत त्या काळी असे होते की, हा ग्रंथ मोठया ज्ञानेश्वरांचा म्हणजे त्याच ज्ञानेश्वरांचा आहे. आज त्यांनाही तसे वाटत नाही. हा ग्रंथ ज्ञानेश्वरांचा आहे असे आग्रहाने प्रतिपादन करणारा कुणीही नाही. हा ग्रंथ त्या ज्ञानेश्वरांचा नाही यावरच जवळजवळ एकमत आहे. आपण निवृत्तिशिष्य आहोत असे 'उत्तर गीता' कारांनीही म्हटलेले नाही.
 याबाबत दोन मुद्दे लक्षात घेणे जरुरीचे आहे, असे मला वाटते. ज्ञानेश्वर या नावाचे अक्षरश: शेकडो लोक गेल्या सातशे वर्षांत होऊन गेले. त्यांच्यातील काही निवृत्तिसुतही असणार व वारकरी संप्रदायाचे कवीही असणार. पण इथे घोटाळा केला जातो. आपण सारे वाङ्मय विठ्ठलपंत आपेगावकरांच्या पुत्राच्या नावे टाकतो.
 दुसरे म्हणजे क्षेपक ग्रंथरचना करण्याची प्रथा भारतभर रूढ आहे. इतिहाससंशोधक कानोले ह्यांच्या संग्रहात माझ्या पाहण्यात अशी एक 'गीता टीका' आली आहे की तिचा लेखक स्वत:ला निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव असे म्हणवून घेतो. तो गीतेवर टीका लिहितो. पण तो माणूस प्रामाणिक आहे. तो ज्ञानेश्वर, नामदेव यांच्यापासून एकनाथांपर्यंत सर्वांना मोठ्या आदराने नमन करतो. ज्ञानेश्वरांच्या नावे तर क्षेपक वाङ्मय भरपूर आहेच, ते ज्ञानेश्वरांचे नाही हेही सर्वांना मान्य आहेच. पण जे ज्ञानेश्वरांचे आहे असे सर्वजण मानतात त्यातही मोठया ज्ञानेश्वरांचे नाही असे खूप आहे. सारेच नाममुद्रा मिरविणारे अभंग ज्ञानदेवकृत आहेत असे मी समजत नाही.


 या 'बनावट' अशा संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या पण निवृत्तिशिष्य नसणाच्या कुणातरी १५ व्या शतकातील ज्ञानदेव नामधारी सामान्य कवीच्या 'अस्सल' ग्रंथाचा विचार करताना त्याला जोडूनच रंगनाथ मोगरेकरांचाही विचार केला पाहिजे. माझे मित्र सदानंद देहूकर या गरीब बिचाऱ्या रंगनाथ मोगरेकरावर एकदम उखडलेले आहेत. रंगनाथ मोगरेकरांनी वाङ्मयचौर्य केले आहे, असे त्यांना वाटते. त्याने वाङ्मयचौर्य केलेले नाही असे माझे मत आहे. वाङ्मयचौर्य इतरत्र प्रसिद्ध असणाऱ्या, आपणास उत्तम वाटलेल्या ग्रंथाच्या संदर्भात संभवते. पण आपल्या काळात तर हा ग्रंथ कुणाला परिचित नाही, म्हणून तो आपणास विनाप्रज्ञा व विना-