पान:परिचय (Parichay).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ७५

महाभारतासारख्या ग्रंथाला ही पद्धत पुरेशी ठरत नाही. लीळाचरित्रालाही ही पद्धत पुरेशी ठरणार नाही. ज्या वेळी संप्रदाय परंपरेची माहिती जतन करतात, पण नोंदवीत नाहीत आणि काही विशिष्ट काळ गेल्यानंतर ही प्राचीन परंपरेने जतन केलेली माहिती नोंदवतात, त्या वेळी नोंद उत्तरकाळात झाली म्हणून माहिती उत्तरकालची, ही तर्कपद्धती अप्रस्तुत होते, हेही ढेरे यांनी दाखवून दिले आहे. परिणामी सर्वच पाठ नोंदविणारी एक लीळाचरित्राची समग्र प्रत आपल्याला सिद्ध करावी लागेल.
 ढेरे यांचा हा प्रबंध तेराव्या शतकातील मराठी वाङ्मयाच्या चिकित्सेचा एक टप्पा सुरू होत आहे, याची ग्वाही देणारा प्रबंध आहे. या नव्या टप्प्यावर आपल्याला ज्ञानेश्वरी, चांगदेवपासष्टी, तत्त्वसार, षट्स्थल, विवेकदर्पण असा एक व्यूह गृहीत धरावा लागेल. या व्यूहातील शेवटचा ग्रंथ विवेकसिंधु आहे. या व्यूहाचा उलगडा करण्यासाठी काश्मिरी शैव, लकुलीश, पाशुपत, कर्नाटकातले वीरशैव, नाथसांप्रदायिक असे सर्व शैव आणि दक्षिण-उत्तरेतील सर्व वैष्णव यांच्या परंपरांचा शोध घ्यावा लागेल व त्या संदर्भात सर्व अभंगवाणी तपासून विवेचन करावे लागेल लीळाचरित्रापासून सुरू होणाऱ्या आणि जुन्या अन्वयस्थळावर येऊन थांबणारा एक दुसरा व्यूह गृहीत धरावा लागेल. त्याचाही शैव-वैष्णव परंपरेत शोध घेऊन त्या वाङमयाची संगती लावावी लागेल. आणि या दोन व्यूहांचा परस्पर अनुबंध समजून घ्यावा लागेल. या चर्चेला सवंग आणि सोपी विधाने यांचा उपयोग नाही. ढेरे निघाले विसोबांचा शोध घेत. विसोबांच्यासाठी ते वांगदेव आणि मुक्ताबाईकडे गेले. त्यामुळे ज्या शैव परंपरांचा धागा सापडला, तो हुडकीत ते एकीकडे महानुभाव संप्रदाय आणि दुसरीकडे वारकरी संप्रदाय इथवर येऊन पोचले. ज्या ठिकाणी ते थांबले आहेत, ते ठिकाण तेराव्या शतकाविषयीच्या सर्व चिंतनाला नव्याने आरंभ करणे भाग पाडणारे आहे. एवढी सगळी उलथापालथ ढेरे यांच्यासारखा स्वतःला नम्र समजणारा संशोधक करू पाहतो, हे नवल नाही काय?
 एक मत असे आहे की, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी महानुभावांच्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी म्हणून लिहिली. ज्ञानेश्वरीत महानुभाव संप्रदायाला उत्तरे देण्याचा प्रसंग कुठे उद्भवलेला नाही, हा प्रश्न निराळा. पण कालदृष्टयासुद्धा या विधानाला काही संगती असू शकते काय ? ज्ञानेश्वरीत उत्तर सापडणार ते तात्त्विक भूमिकेला आणि तात्त्विक पातळीवर. तात्त्विक दष्टीने महानुभाव तत्त्वज्ञानाची पद्धतशीर मांडणी प्रथमतः दृष्टान्तपाठ आणि सूत्रपाठ हे ग्रंथ करतात. केसोबासाचे हे दोन्ही ग्रंथ गोविंदप्रभूंच्या निधनोत्तर काही वर्षांनी, लीळाचरित्र सिद्ध झाल्यानंतर काही वर्षांनी अस्तित्वात येतात. त्यामुळे हे ग्रंथ ज्ञानेश्वरीनंतरचे आहेत. साती ग्रंथांतील भास्करभटाचेच ग्रंथ ज्ञानेश्वरीनंतरचे आहेत, म्हणून इतर ग्रंथ तर नंतरचे अस-