पान:परिचय (Parichay).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७४ । परिचय

भाव पंथाचा त्यांनी केलेला उपदेश हा शेवटच्या आठ वर्षांतील उपदेश आहे. तेव्हा हा उपदेश प्रवर्तित करताना त्यांचे वय पंचेचाळीशी ओलांडून गेले असेल अगर नसेल. हा वेळपर्यंतचा काळ चांगदेव राऊळांचा काळ आहे. तेव्हा त्यांचा गृहत्याग विशी-पंचविशीतला, काही वर्षे परिभ्रमण, काही वर्षे श्रीपर्वत आणि काही वर्षे द्वाराबती असा मधला पंधरा-सोळा वर्षांचा काळ गेलेला दिसतो.
 जर आपण हे सगळे विवेचन डोळयांसमोर ठेवणार असू, तर त्यातून नवनवे मुद्दे उपस्थित होतात. एक तर मुखीचा तांबूल देऊन शिष्य करण्याची प्रथा चांगा वटेश्वराने तत्त्वसारात उल्लेखिलेली आहे. ही प्रथा नाथ संप्रदायातील एका गटात दिसते. पूर्वपंथपरित्याग केल्यानंतरही सवयीचा भाग झालेल्या अशा अनेक नव्या प्रथा पंथात चालू राहतात. त्यामुळे महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञान व वाङ्मय या अभ्यासाव्यतिरिक्त त्या संप्रदायातील सर्व आचार, विचार आणि प्रथा यांचा समाजशास्त्रीय अभ्यास करण्याची गरज वाटू लागली आहे. महानुभाव संप्रदायाच्या विषयी एका बाजूने राग महानुभावेतर मराठी वाङमयात दिसतो. दुसऱ्या बाजूने तेही आपलेच आहेत, असा शंकराचार्यांचा निवाडा दिसतो. एका बाजूने महानुभाव चक्रधरांच्या वाक्याला श्रुती म्हणतात. दुसऱ्या बाजूने ही माणसे स्वतःला वैदिकानुयायी मानतात. ही जी सगळी गुंतागुंत आहे, तिचा उलगडा व संगती केवळ वाङमयीन पुराव्याने होणार नाही; त्यासाठी या पंथाचा समाजशास्त्रीय अभ्यास आता आवश्यक वाटू लागलेला आहे.
 लीळाचरित्राच्या बाबतीत आज विद्वानांची सर्वसाधारण समजूत अशी आहे की, पिढीपाढ हा जुना आहे. इतर पाठ, विशेषतः वाईदेशकर पाठ हा नवा आहे. संशोधनाने असे आढळून येते आहे की, लीळाचरित्राच्या ज्या पोथ्या पिढीपाठाच्या म्हणून ओळखल्या जातात, त्या पोथ्यांच्यामध्ये छापील पिढीपाठात नसलेल्या अनेक लीळा आहेत. आणि पिढीपाठात नसलेल्या लीळांच्यामध्ये अशी खूप माहिती आहे की जी तत्त्वसार आणि षट्स्थल यांच्या आधारे प्राचीन व प्रमाण माहिती आहे, असे सिद्ध करता येते. म्हणून लीळाचरित्राच्या सर्वच पाठपरंपरांच्या उपलब्ध असणाऱ्या एकूण एक पोथ्यांच्यामधील सर्वच पाठांची नोंद करणारी एक समग्र प्रत आता आवश्यक झाली आहे. केवळ काही प्रतींच्या आधारे व उपलब्ध प्रतींतील त्यातल्या त्यात प्राचीन प्रतीच्या आधारे सिद्ध होणारी चिकित्सक प्रत याबाबत उपयोगी नाही. पिढीपाठाच्या आधारे चक्रधरांचे चक्रधर हे नावच सांगता येणार नाही.
 एका जुन्या ग्रंथात उत्तरकालीन प्रक्षेप होत जातात, एवढीच क्रिया ज्या ठिकाणी घडलेली असते, तिथे प्राचीन प्रतींचा- जुन्यात जुन्या असणाऱ्या दोनचार प्रतींचा आधार घेऊन एखाद्या ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती ठरवता येते. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नरेंद्र, भास्कर यांच्या ग्रंथाला ही पद्धत पुरेशी ठरते. पण