पान:परिचय (Parichay).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ७३

हेही वेदान्तीच आहेत. पैकी निंबार्क तर कृष्ण या ईश्वररूपावर आग्रह धरणारे आहेत. तोच आग्रह वल्लभाचार्यांचाही आहे. महानुभाव लेखक ज्याला सिद्धान्त म्हणत आहेत, तो कृष्णाला प्रामुख्य देणारा भक्तिप्रधान द्वैत वेदान्त आहे. हरिनाथ म्हणजे चक्रधर याचा अर्थ हा की, महानुभाव संप्रदाय कृष्णोपासक असला, तरी त्याची परंपरा शैवमार्गाशी निगडित आहे. म्हणून पंचकृष्ण या कल्पनेतला आधार पंचशिवांत शोधणे जास्त आवश्यक आहे.
 पण या बाबीचा अजून एक अर्थ आहे. जो पूर्वायुष्यात चांगदेव राऊळ होता, तोच पुढच्या आयुष्यात चक्रधर झाला, ही गोष्ट मुकुंदराजांना माहीत आहे. म्हणून ते हरिनाथाचे चरित्र सांगताना चांगदेव राऊळांचे चरित्र सांगतात. कारण चांगदेव राऊळांचे चरित्र म्हणजेच चक्रधरांचे चरित्र, अशी त्यांची समजूत आहे. मृत शरीरात आत्म्याने प्रवेश करून ते शरीर उठविणे ही लकुलीश संप्रदायाची एक कथा आहे. तीच पुढे अनेकांना लावलेली आहे. म्हणून लीळाचरित्रात चक्रधर भडोचचे प्रधानपुत्र असल्याची व मृत शरीर उठविण्याची जी कहाणी आलेली आहे, ती ऐतिहासिक तथ्याशी संबंधित नाही. परंपरेची समजूत, इतकाच तिचा अर्थ आहे. सबब चक्रधरांना गुजराती गृहीत धरण्याचे काही कारण नाही. चांगदेव राऊळचं द्वारकेत अनेक वर्षे होते; त्यामुळे चक्रधरांच्या भाषेत काही गुजराती शब्द आढळतात, हे स्पष्टीकरण पुरेसे आहे. एऱ्हवी सर्वज्ञ अपूर्व मराठी बोलतात, हाच लीळाचरित्राचाही अभिप्राय आहे. प्रधानपुत्राचे शरीर उठविण्याचा एक मुद्दा बाद झाला, म्हणजे त्यासह कामाख्येच्या निमित्ताने चांगदेव राऊळांनी देहत्याग केला, हा मुद्दाही आपोआप बाद होतो. ज्या श्रीपर्वतावर चक्रधरांची क्रीडा चालू आहे, तो श्रीपर्वत सालबर्डीचा डोंगर नसून श्रीशैल मल्लिकार्जुन आहे, म्हणून लीळाचरित्रातील विविध स्थळांची नव्याने निश्चिती केली पाहिजे. कारण लीळाचरित्रातील अनेक स्थाने आंध्र प्रदेशात सापडू लागली आहेत. हा सगळा चक्रधरांचा एकांतवास आणि एकांतप्रवास आणि चांगदेव राऊळांचा गृहत्यागोत्तर प्रवास आपण एकरूप मानला पाहिजे व त्या संदर्भात सर्व चर्चा केली पाहिजे. वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार ही आपण तत्कालीन समजूत मानणार, की एक ऐतिहासिक सत्य मानणार? कारण मुक्ताई योगिनी हिनेही वयस्तंभिनीचा स्वीकार केलेला आहे. ही विद्या तिला राजा विक्रमाने दिली (पृष्ठ १२७). चांगा वटेश्वरानेसुद्धा चौदाव्या वर्षी वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार केलेला आहे. चक्रधरांनीही वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार केला आहे. वयस्तंभिनी ही एक समजूतच मानून आपण पुढे गेले पाहिजे. आणि आपण असे म्हटले पाहिजे की, चक्रधर आयुष्याच्या शेवटापर्यंत अगदी तरुण दिसत होते. तेव्हा त्यांचे वय ५५/६० च्या सुमाराचे असावे. याहून अधिक वृद्ध ते असणार नाहीत. महानु- प...५